मुंबई : देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीचे सात टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का याकडे जगभरातून लक्ष लागले आहे. महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत झाली. राज्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये प्रतिष्ठेची लढाई झाली. त्यामुळे कोण कोणते उमेदवार बाजी मारणार हे येत्या 4 जून रोजी लागणाऱ्या निकालामध्ये स्पष्ट होईल. त्यापूर्वी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आपण स्वत: सेफॉलॉजीचा अभ्यास करून काही महाराष्ट्राच्या निकालाचे निष्कर्ष काढले असल्याचा दावा केला आहे.
पुन्हा एकदा मोदी देशाचे पंतप्रधान
चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले “देशभरातले सगळे कल एकच गोष्ट दाखवतायत की पुन्हा एकदा मोदी देशाचे पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे एक्झिट पोल्सवरून मतं व्यक्त करणं बरोबर नसलं, तरी सगळ्या एक्झिट पोलमध्ये एकच गोष्ट दिसणं आनंददायी आहे. एक्झिट पोल्सच्या अंदाजांवर काही बोलण्यात अर्थ नाही. प्रत्यक्षात 4 तारखेला निकाल हाती येतील तेव्हा बोलू”, असे मत चंद्रकांत पाटील यांनी मांडले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लोकसभा निवडणूकीच्या निकालावर भाष्य केले.
माझा सेफॉलॉजीच्या आधारे अभ्यास
पुढे त्यांनी महाराष्ट्रातील एक्झिट पोलबाबत त्यांनी भूमिका मांडली. “राज्यात वेगवेगळे एक्झिट पोल आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागांसाठी मी पूर्ण ठाम आहे. महाराष्ट्रात महायुतीला 38च्या खाली एकही जागा मिळू शकत नाही. काल रात्री मी 35 म्हणत होतो. पण रात्री उशीरापर्यंत मी खूप प्रकारची कामं केली. परमेश्वराला प्रार्थना केली की इतके परिश्रम करूनही इतक्या कमी जागा नको. इतर गणितंही मांडली. सेफॉलॉजीच्या आधारे अभ्यास केला. माझा निष्कर्ष असा आहे की महायुतीला 38 च्या खाली एकही जागा मिळणार नाही. 38 ते 41यादरम्यान त्या जागा असतील. त्यातून सर्व कार्यकर्त्यांना काम करण्याचं समाधान मिळेल” असा स्पष्ट दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.