Maharashtra Rain update:
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज रविवारी (14 सप्टेंबर) आणि उद्या सोमवार (15 सप्टेंबर) या दोन दिवसांत राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, धुळे आणि नंदुरबार वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यास आज (रविवारी) मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उद्या सोमवारी सातारा, रत्नागिरी, पुणे आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात कालपासून झालेल्या मुसळधार व ढगफुटीसदृश्य पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून, नागरिकांचे स्थलांतर तसेच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपूर, बीड, जालना, बार्शी यांसह सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची तीव्रता वाढली. आधीच पूरसदृश्य स्थितीत असलेल्या जिल्ह्यात नवीन अडचणी निर्माण झाल्या. इरई धरणाचे सातही दरवाजे एक मीटरने उघडण्यात आल्याने नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. याशिवाय अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांतील मुसळधार पावसाचा परिणाम म्हणून वर्धा नदीलाही मोठा पूर आला आहे. शहरातील रहमतनगर आणि सिस्टर कॉलनी भागात नदीचे पाणी शिरले असून, जवळपास 50 ते 60 नागरिकांना चंद्रपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून बिंदुसरा नदीसह परिसरातील अनेक नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ झाल्याने काही प्रमाणात समाधान व्यक्त केले जात असले तरी खरीप हंगामातील पिके तसेच काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. दरम्यान, अंत्रोळीकर भागात मगर दिसल्याचा दावा करणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, हा फोटो कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेला असल्याचे समोर आले असून प्रत्यक्षात कोणतीही मगर आढळलेली नाही.
वनविभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि भीती न बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच खोटे फोटो तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
पैठण तालुक्यात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे कुरण पिंपरी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. नदीतून तब्बल 1.15 लाख क्यूसेकने विसर्ग सोडल्यामुळे परिसरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांची गैरसोय झाली असून, अनेक घरांना पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळे खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे. मका, कपाशी, उडीद, मूग यांसारख्या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.
या वर्षात प्रथमच जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून 1 लाख 13 हजार 184 क्युसेकने विसर्ग सुरू असून, 9 आपत्कालीन दरवाजे देखील उघडण्यात आले आहेत. दरवाजे 0.5 फूट उचलून 4.5 फूटांपर्यंत उघडण्यात आल्याने गोदावरी पात्रात पाण्याची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे
मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा.
नाशिक, अहमदनगर, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया.