
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; सोलापूरचा विजय लमकणे राज्यात पहिला
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा अंतिम निकाल गुरुवारी उशिरा रात्री जाहीर झाला. या निकालात सोलापूर जिल्ह्यातील विजय लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवून सर्वाधिक यश संपादन केले आहे.
साताऱ्याचे हिमालय घोरपडे दुसऱ्या तर नाशिकचे रवींद्र भाबड तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, २७ ते २९ मे २०२४ दरम्यान राज्यसेवा मुख्य परीक्षा पार पडली होती. या परीक्षेनंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या १ हजार ५१६ उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. या मुलाखती ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्यानंतर आयोगाने अंतिम गुणवत्ता यादी आणि पात्रतागुण दि. ३० ऑक्टोबर रात्री जाहीर केले.
हेदेखील वाचा : 2026 साठी CBSE ने जाहीर केली डेटशीट! ‘या’ तारखांना होणार परीक्षा
एमपीएससीने स्पष्ट केले आहे की हा निकाल आरक्षणाच्या समांतर आरक्षणाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयीन निर्णयानुसार काही बदल होण्याची शक्यता आयोगाने नाकारलेली नाही.
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता आयोगाकडून पुढील टप्प्याची नियुक्ती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, सेवावाटप आणि नियुक्तीविषयक कार्यवाही आगामी काही दिवसांत करण्यात येईल. या निकालामुळे अनेक तरुणांच्या भावी कारकिर्दीला दिशा मिळाली असून, महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवेत नव्या पिढीच्या अधिकाऱ्यांचे स्वागत होणार आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांची डेटशीट जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2026 साली होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची डेटशीट जाहीर केली आहे. या वेळापत्रकानुसार, दहावीची परीक्षा १७ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे, तर बारावीची परीक्षा १७ फेब्रुवारी ते ९ एप्रिल २०२६ या दरम्यान पार पडेल. विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा आणि कोणत्याही विषयाच्या तारखा एकमेकांवर येऊ नयेत, म्हणून यंदा डेटशीट वेळेआधी जाहीर करण्यात आली आहे.