"...त्यामुळे त्यांना मतदानातून योग्य उत्तर द्या"; प्रचारादरम्यान वळसे पाटलांची विरोधकांवर जोरदार टीका
मंचर: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. त्या सर्वांनी अर्ज देखील दाखल केले आहेत. दरम्यान आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. महायुतीने पुण्यातील आंबेगाव शिरूरमधून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. वळसे पाटील यांनी देखील प्रचारास सुरुवात केली आहे. “तीर्थक्षेत्र भीमाशंकर परिसर विकासासाठी आपण १४८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केलेला आहे. यामुळे पर्यटन वाढणार असून येथील आदिवासी समाजाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे . विरोधी उमेदवाराला आता निवडणुक आल्यावरच आदिवासी भागातील जनतेचा पुळका आला आहे. त्यांना मतदानातून योग्य उत्तर द्या ” असे आवाहन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले .
आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांचा दौरा केला . यावेळी म्हातारबाची वाडी, जांभोरी येथे झालेल्या कोपरासभेत वळसे पाटील बोलत होते . आदिवासी नेते सुभाष मोरमारे, प्रकाश घोलप, संजय गवारी, सलीम तांबोळी, रूपाली जगदाळे, इंदुबाई लोहकरे, जनाबाई उगले,सरपंच सुनंदा पारधी, कोंडवळचे उपसरपंच नितीन लोहकरे, शामराव बांबळे, मारुती लोहकरे, मारुती केंगले,निलेश साबळे, किसन पारधी, विठ्ठल पारधी, दुंदा भोकटे, किसन पोटे आदी मान्यवर उपस्थित होते .
महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले “पुढील पाच वर्षात आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील भीमाशंकर, आहुपे, पाटण व बोरघर खोऱ्यात शेतीच्या व पाण्यासाठी च्या जलसिंचन योजना राबविणार आहे .आपण तेरुंगण तलाव, गोठेवाडी तलाव व पायलडोह तलाव निर्माण केल्याने अनेक शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर ला देशाच्या कानाकोपऱ्यातुन लाखो भाविक येत असतात. यासाठी आपण १४८ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे . हिरड्याचे नुकसान झालेल्या आदिवासी बांधवांना सुमारे १४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई आपण प्रयत्न करून मिळवून दिली. या पुढील काळात या भागात शेती व्यवसाय बागायती होण्यासाठी आपण प्रयत्न करणार. आहे .
लोकसभा निवडणुकीत फसवले
आता विरोधकांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आदिवासींचे आरक्षण जाणार, संविधानात बदल होणार असा प्रचार करून मते मिळवली . निवडून आलेले खासदार आता मतदार संघात फिरत नाही . लोकसभेप्रमाणे आता विधानसभेच्या निवडणुकीत खोट्या भूलथापांना बळी पडू नका . असे आवाहन वळसे पाटील यांनी केले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. यावेळेस जनता महायुती की महाविकास आघाडीला सत्तेत बसवणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.