
मांडवकडा धबधबा ठरतोय निसर्गप्रेमी पर्यटकांचे आकर्षण
पाटण : पाटण तालुका म्हणजे पावसाळी पर्यटनाचे केंद्र बनत आहे. जंगल व हिरवाईने नटलेले या तालुक्यातील दऱ्याखोऱ्यात कडेकपाऱ्यावरुन कोसळणारे धबधबे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. घाणबी जवळील घनदाट जंगलातील उंच कड्यावरून कोसळणारा मांडवकडा धबधबा सामाजिक माध्यमातून प्रसिध्दीच्या झोतात येत असून, तरुणाईची पावले हा धबधबा पाहण्याकडे वळली आहेत.
या धबधब्याकडे जाण्यासाठी काही अंतराचा जंगलट्रेक, घसरटी पायवाट याचा थरार अनुभवत मांडवकडा धबधबा पाहण्याचा आनंद तरुणाई घेत आहे. उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा निसर्गाचा आविष्कार असला तरी येथे जाणे जिकिरीचे आहे. स्थानिक पातळीवर घाणबी, कारवट येथील गावकऱ्यांनी धबधब्याकडे जाणारा मार्ग सुकर करुन पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केल्यास रोजगाराच्या मोठ्या संधी येथे उपलब्ध होऊ शकतील, असे मत धबधब्याकडे येणारे पर्यटक व्यक्त करत आहेत.
पाटण तालुक्यात ओझर्डे धबधब्यासह मांडवकडा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या घाणबी गावापासून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटे अंतरावर घनदाट जंगलाच्या कुशीत लपलेला मांडवकडा धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात डोंगररांगांवरून कोसळणार्या पाण्यामुळे मांडवकडा धबधब्याचे निसर्गसौंदर्य अधिकच खुलून दिसत असून परिसरातील हिरवाई, डोंगर आणि वाहत्या पाण्याचा मनमोहक संगम पर्यटकांना भुरळ घालत आहे. सातारा जिल्ह्यासह परजिल्ह्यातील पर्यटक याठिकाणी भेटी देत आहेत.
तालुक्यात पठारावरील दुर्गम ठिकाणी वसलेल्या घाणबी गावापासून आणि कारवट येथून धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनीटे डोंगरातील पाय वाटेने चालत जावे लागते. दोन्ही ठिकाणांहून वाहन थेट धबधब्यापर्यंत पोहोचत नसल्याने निसर्गप्रेमींना पायी चालत जंगलातून वाट काढत धबधब्यापर्यंत पोहोचावे लागते. हा छोटासा ट्रेक पर्यटकांसाठी वेगळाच अनुभव ठरत आहे. ट्रेक करत असताना तीव्र डोंगरउतार व चिखल असल्याने स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.
अत्यंत अडचणी पार करत या धबधब्यापर्यंत पोहोचावे लागते. पावसाळ्यात परिसरातील झाडाझुडपांमधून जाणारी पायवाट, डोंगरावरून वाहणारे छोटे-छोटे पाण्याचे प्रवाह आणि सर्वत्र पसरलेली हिरवाई यामुळे मांडवकडा परिसराचे रूप एखाद्या निसर्गचित्रासारखे भासते. धबधब्याजवळ पोहोचल्यानंतर उंच कड्यावरून कोसळणाऱ्या फेसाळ पाण्याच्या आवाजाने पर्यटकांच्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळते.
मांडवकडा धबधबा अद्याप तुलनेने पर्यटकांच्या गर्दीपासून दूर आणि नैसर्गिक अवस्थेत असल्याने या ठिकाणचे आकर्षण कायम आहे. मात्र धबधब्याकडे जाणारी पायवाट डोंगराळ व निसरडी असल्याने पर्यटकांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. घसरड्या दगडांवरून चालताना सावधगिरी बाळगावी, तसेच धबधब्याच्या प्रवाहाजवळ धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे.
निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद देणार्या मांडवकडा धबधब्याचा परिसर पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करताना त्याचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवण्याची गरज आहे. योग्य नियोजनातून पायवाट सुरक्षित करणे, दिशादर्शक फलक लावणे आणि स्वच्छता राखण्याची व्यवस्था केल्यास मांडवकडा धबधबा पाटण तालुक्यातील आणखी एक आकर्षक निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकतो.
पंचायत राजच्या दौऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ; प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळांची समिती करणार पाहणी