manoj jarange patil on hunger strike for maratha reservation
जालना : महायुतीचे सरकार येऊन दोन महिने झाले असून एका मागून एक अडचणी येत आहे. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या जालन्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणावर बसले आहेत. त्यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे.
मागील दोन वर्षापासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण, आंदोलन आणि मोर्चा काढून जोरदार आरक्षणाची मागणी केली आहे. मराठा समाज हा कुणबी असून सर्व मराठा समाजाला कुणबी अंतर्गत ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे अशी मूळ मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यात महायुतीला अद्याप यश आलेले नाही. यामुळे महायुती सरकार विरुद्ध मनोज जरांगे पाटील असे चित्र अनेकदा राज्यामध्ये दिसून येत आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
विधानसभा निवडणूकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडून राजकारणाच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी निर्णय मागे घेऊन माघार घेतली. राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला लक्ष देऊन मतदान करायला सांगितले होते. मात्र तरी देखील राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद गेले असून आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नेहमीच देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. आता फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्यामुळे जरांगे पाटील यांचे उपोषण तीव्र होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले असून आपली भूमिका मांडली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “तुमच्या मनामध्ये आमच्या लेकरांच्या जेवणात विष कालवण्याचा विचार आहे. आम्हाला फक्त आमचं आहे ते द्या. मागण्या सगळ्या मान्य करा. आणि तुम्ही दिल्या नाही करी हरकत नाही. दिल्या नाहीत तर आमच्यासमोर चित्र स्पष्ट होईल. आता हे उपोषण सुरु आहे. उपोषण आहे तो पर्यंत काही बोलणार नाही. उपोषण पूर्ण होऊ द्या. पण मग त्याच्यानंतर त्यांचा आणि आपला सामना लागेल,” अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी तत्कालीन एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला होता. मात्र आता मुख्यमंत्री बदलले आहेत. यावर जरांगे पाटील म्हणाले की, “त्यावेळेस तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना करु दिलं जात नव्हतं. आता सगळं यांच्याकडे आहे. ते होते तेव्हा त्यांनी काही दिलं आता राहिलं आहे ते तुम्ही द्या. शिंदे चांगले आणि फडणवीस वाईट असं म्हणण्यापेक्षा आता राहिलं आहे ते देऊन टाका. त्यांनी नाही दिलं तर तुम्ही द्या. बघू आता कोण काय देत आहे. त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात येणारच आहे,” असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण कधी संपेल याबाबत देखील माध्यमांनी त्यांना प्रश्न केला. याबाबत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे उपोषण अर्धे राहिल असे बोलले होते. याबाबत जरांगे पाटील म्हणाले की, “त्यांना नाही कळणार. त्यांना उपोषण म्हणजे काय असतं हे नाही कळणार. त्यांना लोकांच्या भावना नाही कळणार. गरिबांच्या भावना, उपोषण, आंदोलन कधी थांबवायचं आणि कोणत्या टप्प्यावर नाही थांबवायचं हे त्यांना कळणार नाही. यांना राखरांगोळी करुन घेण्याची सवय लागली आहे. समाजाला काय आणि कधी द्यायचं हे त्यांना कळायचं नाही. समाजाच्या पदरात कसं पाडून घ्यायचं हे माझ्या मनात असतं. म्हणून मागील 75 वर्षात कधी न मिळणार आरक्षण मी गोरगरिबांच्या पदरात टाकलं आहे. आता हे उपोषण कसं होणार हे सगळ्यांना कळणार आहे,” अशा भावना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच राज्यात इतर ठिकाणी आंदोलन करु नये असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.