Minority Commission Chairman Pyare Khan aggressive on Nitesh Rane suggested eco-friendly Bakri Eid
नागपूर : लवकरच बकरी ईद साजरी केली जाणार आहे. मात्र यावरुन आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे. हिंदूंचे सण जर इको फ्रेंडली साजरे होतात त्याचप्रमाणे बकरी ईद देखील इको फ्रेंडली साजरी झाली पाहिजे असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे. तसेच प्यारे खान यांची भूमिका इस्लामला बदनाम करणारी असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे. यावर आता अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नितेश राणे यांच्या सल्ला आणि टोल्यांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्यारे खान म्हणाले की, “इस्लामचे जे कन्सेप्ट आहे ते एकदम क्लिअर आहेत, इस्लाममध्ये कधीही कोणावरही जोर जबरदस्ती करण्यात येत नाही. व्हर्च्युअल ईद साजरी करण्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र कोणावर प्रेशर टाकणे योग्य नाही, काय करायचे, काय नाही ते मुस्लिम धर्मीय जानतात. आमच्या समाजाची पद्धती काय आहेत ते आम्हाला माहित आहेत, ते त्यांनी सांगायची त गरज नाही,” अशा कडक शब्दांत प्यारे खान यांनी राणेंना प्रत्त्युत्तर दिले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “कधी कोणत्याही मुस्लिमाने होळी किंवा दिवाळी बाबत बोलल असेल तर सांगा? मुस्लिमांनी कधीही कोणाच्या सणावर टीकाटिप्पणी केली नाही. आमच्याकडे लहानपणापासून दिवाळी साजरी करतात, फटाके फोडण्यात येतात. राणे यांनी म्हटलं की मी त्यांना नमस्कार करतो, तर नमस्कार करणे हे आमचे संस्कार आहेत. मित्रांना भेटल्यावर नमस्कार करणे हे आमचे संस्कार आहेत. मी गडकरी, फडणवीस यांच्यासोबत राहतो त्यामुळे मी संस्कारी आहे. मी चिडलो यासाठी की ते (नितेश राणे) देवेंद्र फडणवीस यांचा नाव घेतात, त्यामुळे त्यांचं नाव खराब करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याचा उत्तर मिळेल. त्यांच्या सल्ल्याची गरज नाही, सरकार आहे, इथे, जे इथे राहतात तिथे त्या कायद्याचं पालन करावे, आणि केवळ मुस्लिम समाजाचे लोक नॉनव्हेज खातात असं नाही, सगळे समाजाचे लोक नॉनव्हेज खातात, आणि त्यावर अभ्यास करून बोलावं,” असे देखील स्पष्ट मत अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले नितेश राणे?
नागपूर दौऱ्यावर असताना अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्यावर बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने आपली भूमिका जबाबदारीने निभावली पाहिजे असे मला वाटते. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाला एकत्रित कसे करू शकता त्यांचे प्रबोधन कसा करू शकता, यावर भूमिका मांडली पाहिजे. सध्या त्यांची जी भूमिका आहे ती ती इस्लामला बदनाम करणारी आहे. जेव्हा हिंदू समाजाला इको फ्रेंडली होळी, इको फ्रेंडली दिवाळी, फटाके मुक्त दिवाळी साजरे करण्याचे सल्ले दिले जातात. हिंदू समाज आपला धाक दाखवत नाही. तसाच विचार मुस्लिमांनी करावा अशी माझी भूमिका व सल्ला आहे. जसं हिंदू समाज पर्यावरणवाद्यांचा ऐकतो आणि फटाके वाजवत नाही, रंग खेळत नाही, मुस्लिमांनी इको फ्रेंडली बकरी ईद करावी हा माझा चांगला सल्ला आहे.” असे मंत्री नितेश राणे म्हणाले होते.