पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला मनसे नेते अमेय खोपकर यांनी इशारा दिला आहे. सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या लव्ह स्टोरीवर चित्रपट बनवला जात आहे, ज्यामध्ये सीमा हैदर देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहे. परंतु हे सर्व नाटक त्वरित बंद करा, नाहीतर मनसेच्या स्टाईलने कारवाई होईल असा इशारा मनसे (MNS) नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी दिला आहे.
सीमा हैदर हि महिला तिचा प्रियकर सचिनला भेटण्यासाठी पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आली आहे. सीमा हैदरने सर्व नाटक बंद करावं, अन्यथा मनसेकडून कारवाईला सामोरं जावं, असा कडक इशारा मनसे नेते अमय खोपकर यांनी दिला. या दोघांच्या लव्ह स्टोरीवर चित्रपट निर्माते अमित जानी ‘कराची टू नोएडा’ हा चित्रपट बनवत आहेत, ज्याचे शूटिंग सुरू करण्यात आलं आहे.
सीमा हैदरच्या चित्रपटाला मनसेचा विरोध
अमेय खोपकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत स्थान मिळू नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. पाकिस्तानी महिला सीमा हैदर सध्या भारतात आहे. ती ISI एजंट असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. आमच्या चित्रपटसृष्टीतील काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी सीमा हैदरला अभिनेत्री बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.”
मनसे नेते अमेय खोपकर पुढे म्हणाले, या देशद्रोही लोकांना लाज कशी वाटत नाही? असे तमाशे ताबडतोब बंद करा, अन्यथा मनसेचा धडक कारवाईसाठी सज्ज राहा. ऐकलं नाही, तर राडा होईल असा जाहीर इशारा मनसेने दिला आहे.
पाकिस्तानी महिला सीमा हैदरने सांगितल्याप्रमाणे, कोरोना काळात PUBG गेम खेळताना ग्रेटर नोएडातील रबुपुरा भागात राहणाऱ्या 22 वर्षीय सचिन मीनाच्या प्रेमात सीमा पडली. सीमा आधीच विवाहित होती आणि तिच्यासोबत तिची चार मुलंही भारतात आली आहेत. सीमा आणि सचिनलाही बेकायदेशीरपणे भारतात आल्याबद्दल अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर दोघांची जामिनावर सुटका झाली आहे.