कल्याण मारहाण प्रकरण! अखिलेश शुक्लांकडून देशमुख कुटुंबावरचं गंभीर आरोप, काय म्हणाले एकदा ऐकाच
कल्याणच्या योगीधाम परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत गुरुवारी सायंकाळी मराठी माणसाला अमराठी व्यक्तीने मारहाण केली. अजमेरा सोसायटीमधील हा प्रकार असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.मारहाणीचं हे प्रकरण थेट विधानसभेतही पोहोचलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात भूमिका मांडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान अखिलेश शुक्ला या संपूर्ण प्रकरणात देशमुख कुंटुंबावरच आरोप केले आहेत.
अखिलेश शुक्लांनी व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांची भूमिका मांडली आहे. या व्हिडीओमध्ये अखिलेश शुक्ला यांनी देशमुख कुटुंबावरच मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.देशमुख कुटुंबीयांनी आपल्या पत्नीला शिवीगाळ करून तिचे केस ओढले. नंतर झालेला प्रकार हा पत्नीला वाचवण्यासाठी घडला, अशी बाजू अखिलेश शुक्ला यांनी मांडली आहे.
UPDATE
Kalyan
Akhilesh Shukla, the absconding accused in the Kalyan Marathi family assault case, is in police custody
He is surrendered to the police after posting a video on social media,#Kalyan#AbhijitDeshmukh #AkhileshShukla#MarathiFamily #Mumbai https://t.co/q9FvX62bwx pic.twitter.com/o3Y8ix8zhw
— Milind Sagare (@MilindSagare1) December 20, 2024
“दोन दिवसांपासून माझ्या घरचं जे प्रकरण व्हायरल होत आहे, त्यासंदर्भात नेमकं काय झालं हे मी सांगतोय. “एक वर्षापूर्वी मी माझ्या घरचं इंटेरियर केलं. त्यात माझी शूरॅक डाव्या बाजूकडून मी उजव्या बाजूला घेतली. पण त्याचा फ्लॅट क्रमांक ४०४मध्ये राहणारे देशमुख कुटुंब आणि ४०३ मध्ये राहणारे कविळकट्टे कुटुंब यांना राग आला. या दोघांनी खूप वाद घातला. ‘शूरॅक आधीच्याच ठिकाणी ठेवा नाहीतर आम्ही तो तोडून फेकून देऊ’ असं ते म्हणाले. ते रोज मला व माझ्या पत्नीला त्रास देत होते. दररोज शिवीगाळ करणं, त्रास देणं हे होत होतं”, असा दावा शुक्ला यांनी व्हिडीओमध्ये केला आहे.
“माझी पत्नी सतत मला ऑफिसमधून आल्यावर हे सांगत होती. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण परवा संध्याकाळी माझ्या बायकोने धूप लावून दरवाज्याबाहेर ठेवलं. कवीलकट्टेंनी सांगितलं की धूपमुळे आम्हाला त्रास होतो. तुम्ही हे लावू नका नाहीतर आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही. माझ्या बायकोला त्यांनी शिवीगाळ केली. मी मध्ये पडून वाद सोडवायचा प्रयत्न केला. पण धीरज देशमुख आणि त्याच्या लहान भावाने येऊन माझ्या बायकोला शिवीगाळ करायला सुरुवात केली. आमचा दरवाजा जोरात ठोकायला लागले. माझ्या पत्नीचे केस खेचून त्यांनी तिला कानाखालीही मारली. मी तिला सोडवायचा प्रयत्न केला तर त्यांनी मलाही शिवीगाळ केली”, असा धक्कादायक आरोप शुक्ला यांनी देशमुख भावंडांवर केला आहे.
“हा सगळा विषय उलट बाजूने सांगून व्हिडीओ व्हायरल केला जातोय. त्या व्हिडीओत फक्त भांडण दिसतंय. त्याच्या मागे नेमकं काय घडलं ते कुणाला माहिती नाही”, असंही ते व्हिडीओमध्ये म्हणाले. “आम्ही जे केलं, ते माझ्या पत्नीच्या बचावासाठी केलं”
“देशमुख कुटुंब आम्हाला एक वर्षापासून त्रास देत होते. दोन दिवसांपूर्वी जे घडलं, त्यावेळी माझ्या मराठी बांधवांनीच मला सहकार्य केलं आणि वाचवलं. आम्ही गेल्या पाच पिढ्यांपासून महाराष्ट्रात राहतो. आम्हाला १०० वर्षं झाली. परप्रांतीय आहोत का, मराठी आहोत की नाही याची आम्हाला कधीच जाणीव झाली नाही. पण या लोकांनी हा विषय एवढा गाजवला. माझ्या बायकोला शिवीगाळ करताना ते असंही म्हणाले की ‘तुम्ही परप्रांतीय लोक घाण करत आहात, आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही काय आहोत’,
“देशमुख कुटुंबानं माझ्या बायकोला मारलं, शिवीगाळ केली. आम्ही जे केलं, ते माझ्या पत्नीला वाचवण्यासाठी केलं. त्यानंतर या लोकांनी त्याला परप्रांतीय वगैरे म्हणून विषय भलतीकडे नेला. मीही महाराष्ट्रीय आहे. आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं”, असं अखिलेश शुक्ला यांनी व्हिडीओच्या शेवटी म्हटलं आहे.