भाईंदर (प्रतिनिधि – विजय काते) : विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्याची मुदत सोमवारी सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. त्यामुळे रविवारचा मुहूर्त साधून शहरातील सर्वच उमेदवारांनी रविवारी १७ नोव्हेंबर रोजी जोरदार प्रचार केला. ढोल-ताशांचा गजर, समर्थकांसह काढलेल्या रॅली, पदयात्रा, प्रचारफेऱ्या, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पत्रके वाटप आणि मतदारांशी थेट संपर्क करत आपले पारडे जड करण्याचा प्रयत्न केला. शहरात प्रचाराची राळ उडाली अन् आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. राजकीय कलगीतुराही जोरदार रंगला होता. विधानसभा निवडणूक १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. या निवडणुकीसाठी २२ ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी होता. मतदान बुधवारी दि. २० नोव्हेंबर रोजी होणार असल्याने, प्रचाराचा शेवट सोमवारी सायंकाळी होणार आहे. मागील २० दिवसांत प्रचारसभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पायांना भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढला.
महाराष्ट्र निवडणुक संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
दारोदारी जाऊन नागरिकांची भेट घेत मतदान करण्याचे आवाहन केले. मतदारांपर्यंत स्वतःचे नाव, निवडणूक चिन्ह पोहोचवले. यामुळे रविवारी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तशीच परिस्थिती आज सोमवारीही सुद्धा दिसत आहे. मिराभाईंदर शहरातील चर्चेचा विषय ठरलेली 145 विधानसभा क्षेत्रची उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाचे नरेंद्र मेहता यांना मिळाली. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार मुजफ्फर हुसेन अपक्ष म्हणून गीता जैन आणि अरुण कदम, उत्तर भारतीयांचा चेहरा हंसूकुमार पांडे हे अपक्ष म्हणून लढत आहेत. तसेच मनसेचे उमेदवार संदीप राणे हे या निवडणुकीच्या लढतीमध्ये आपली ताकत आजमावत आहे. तसेच मीरा भाईंदर शहराच्या 146 विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे नरेश मनेरा आणि मनसेचे संदीप पाचंगे अशी तिहेरी लढत आहे. येत्या 20 तारखेला जनतेचा कौल कोणाच्या पदरात असेल हे जनता मायबाप ठरविणार आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने सोमवारी १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ पासून प्रचार बंद होईल. उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मिडीया, इलेक्ट्रॉनिक मीडियारूनही जाहिराती, प्रचार करता येणार नाही. यावर निवडणूक यंत्रणेचे लक्ष असून कोणीही निवडणूक आयोगाच्या नियमाचा भंग करु नये, असे आवाहन राज्य मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने वर्तमानपत्रात १९ आणि २० नोव्हेंबर रोजी जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवसापुर्वी प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसले अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केंद्रीय निवडणुक आयोगाकडून राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
१९ आणि २० नोव्हेंबर रोजी राजकीय पक्ष, कोणतीही संस्था किंवा व्यक्तीगत स्वरूपात वर्तमानपत्रात जाहिरात द्यायची असल्यास राज्य/जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व-प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करुन नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. प्रचार संपल्याचा कालावधीत दृकश्राव्य माध्यमे (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडिया) यावर शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या तसेच निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास मनाई आहे. राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी आहे.