मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याबाबत उत्सुकता लागली होती. अशात राज्याच्या राजकीय वर्तुळातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यामुळे आज राज्याच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या 26 नोव्हेंबर ला विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वीच निवडणुका घेणे बंधणकारक असल्याने आजच या निवडणुकाची घोषणा होऊ शकते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यातच महाराष्ट्राचा दौरा करत राज्यातील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत 26नोव्हेंबर पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही आयोगाकडून सांगण्यात आले होते. तसेच, आचारसंहितेचा कालावधी 30 दिवसांचा असल्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते.
हेही वाचा: Maharashtra Assembly Election 2024: राज्यात घडामोडींना वेग; उद्यापासून लागणार आचारसंहिता?
केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आज दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्याच्या निवडणूका जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यानस लोकसभा निवडणुकांनंतर राज्यात लगेचच विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरूवात झाली होती. गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांचे दौरे, मेळावे, सभाही सुरू होत्या. पण आता या निवडणुकीची रणधुमाळी अधिकच तीव्र होणार आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या निवडणुका जाहीर होतील.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत मतदान होऊ शकते. तर 20 ते 25 नोव्हेंबर या काळात मतमोजणी केली जाईल, 26 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने त्याआधीच नवे सरकार सत्तेत येईल. असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते.