मुंबई: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या यात्रेदरम्यान झालेल्या छेडछाडीच्या घटनेमुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यातील बलात्कार प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरण, मंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेली शिक्षा तसेच वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत झालेली वाढ या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आजपासून (3 मार्च) सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकारला विरोधकांकडून जोरदार टिकेला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी एका पुस्तिकेद्वारे 11 प्रमुख घोटाळ्यांची माहिती सादर करत सरकारला अडचणीत आणण्याची तयारी केली आहे.
वाचा काय म्हणााले रोहित पवार?
आमदार रोहित पवार यांनी सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल करत म्हटले की, नवीन योजना जाहीर केल्याने महाराष्ट्राच्या तिजोरीवर भार पडणार नाही, परंतु गेल्या अडीच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या दलालीमुळेच महाराष्ट्र आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या काळात तब्बल 50 हजार कोटी रुपयांहून अधिक दलाली घेतली गेली, ज्यामुळे राज्य भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकले आहे.
कमी वयात त्वचा सैल झाली आहे? मग त्वचा घट्ट होण्यासाठी करा ‘हे’ प्रभावी उपाय, चेहरा राहील कायम तरुण
रोहित पवार म्हणाले की, एमएसआयडीसी घोटाळा, एमएसआरडीसी घोटाळा, समृद्धी महामार्ग घोटाळा, आश्रमशाळांतील दूध घोटाळा, सामाजिक न्याय विभागातील भोजन पुरवठा घोटाळा, कंत्राटी भरती घोटाळा आणि एमआयडीसी घोटाळा यासारखे अनेक घोटाळे झाले असून, त्यांनी स्वतः कागदपत्रांसह हे घोटाळे समोर आणले आहेत. रोहित पवार यांनी सरकारवर आरोप करत म्हटले की, महायुती सरकारचे सूत्र हे “सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता” असे आहे. दलालीच्या पैशातून राज्यातील सामान्य नागरिकांचा हक्क आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकत घेण्याचा हा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र हल्ला चढवत स्पष्ट केले की, महाराष्ट्राला दलालीच्या दलदलीत अडकवणाऱ्या सत्ताधारी दलालांचा खरा चेहरा उघड करणे अत्यावश्यक होते, आणि ते कार्य आम्ही प्रामाणिकपणे केले आहे व भविष्यातही करत राहू. महाराष्ट्राच्या भल्यासाठी, स्वाभिमानासाठी, मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी हा लढा आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेने साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठी माणूस स्वाभिमानी आहे, त्यामुळे या लढ्यास नक्कीच जनतेचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पुढील विधानसभेच्या निवडणुकीत “महाराष्ट्र लुटणाऱ्या आणि द्वेष करणाऱ्या दलालांना त्यांनीच तयार केलेल्या दलदलीत गाडल्याशिवाय गप्प बसायचे नाही” असा निर्धार करण्याचे आवाहन केले.