
Marathi Breaking news live updates: तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत कौंटुबिक वादातून कोणालाही न सांगता बाहेर पडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण तानाजी सांवत यांनी पोलिसांमार्फत चक्रेफिरवत बँकॉकला जाणारे विमान चैन्नईत उतरवायला लावले.
11 Feb 2025 05:27 PM (IST)
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून 'इंडियाज गॉट लेटेंट' या यूट्यूब शोवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. संघटनेने शोच्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहनही केले आहे. AICWA म्हणते की हा शो आक्षेपार्ह सामग्री प्रसारित करत आहे, ज्यामुळे समाजाला चुकीचा संदेश जाऊ शकतो. या मुद्द्यावर सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु या पत्रानंतर हे प्रकरण आणखी वाढले आहे.
11 Feb 2025 04:27 PM (IST)
भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी बेंगळुरू मेट्रोच्या भाड्यात वाढ करण्यास आक्षेप घेतला आणि म्हटले की यामुळे सामान्य माणूस आणि मध्यमवर्गावर अतिरिक्त भार पडेल. लोकसभेत शून्य प्रहरात त्यांनी राज्य सरकार आणि बीएमआरसीएलने भाडे निर्धारण समितीच्या शिफारशींची पुनर्तपासणी करावी अशी मागणी केली. सूर्या म्हणाले की सार्वजनिक वाहतूक परवडणारी आणि सुलभ असावी जेणेकरून लोक खाजगी वाहनांपेक्षा मेट्रोला प्राधान्य देतील आणि शहरातील गर्दी कमी होईल.
11 Feb 2025 04:26 PM (IST)
बीजेडी खासदार सस्मित पात्रा यांनी युट्यूबर रणवीर इलाहाबादिया यांच्या वादग्रस्त विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीमध्ये आपण हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि समिती ते गांभीर्याने घेईल आणि कठोर कारवाई करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
11 Feb 2025 03:34 PM (IST)
✅ देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघरसाठी 2599.15 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली. प्रकल्पातून 69.42 दलघमी पाणीसाठा वसई-विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवला जाईल.
✅ जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना ता. दौंड, बारामती आणि पुरंदर जि. पुणे योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत 438.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
- जनाईतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागात 8350 हेक्टरला सिंचन
- शिरसाईतून बारामती, पुरंदरच्या अवर्षण भागात 5730 हेक्टरला सिंचन
✅ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांत 2019 मध्ये दुरुस्ती करणार
11 Feb 2025 03:13 PM (IST)
AI मुळे लोकांचे आयुष्य बदलू शकते. त्याचवेळी रोजगाराच्या प्रश्नावरही लक्ष द्यायला हवे. एआय हे इतर तंत्रज्ञानापेक्षा वेगळे आहे. मानवी जीवन अधिक सुलभ होणार असले तरी त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडेही पाहायला हवे, अशी अपेक्षा नरेंद्र मोदींनी व्यक्त केली. फ्रान्समध्ये आयोजित एआय समिटमध्ये ते बोलत होते.
11 Feb 2025 02:12 PM (IST)
पंजाबचे आमदार आणि मंत्र्यांनी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्याशी केलेल्या भेटीबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, “दिल्लीचा पराभव हा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का आहे. पंजाबची स्थितीही चांगली नाही. शेतकरी आणि गरिबांसाठी कोणताही दिलासा नाही. दिल्लीच्या निवडणुका पाहता, अरविंद केजरीवाल यांना वाटते की काहीतरी चूक होऊ शकते आणि म्हणूनच त्यांनी ही बैठक बोलावली असावी. पंजाब लवकरच त्यांच्या हातातून निसटून जाईल.
11 Feb 2025 01:58 PM (IST)
शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. सेन्सेक्स कोसळला आहे. तो १,०१९ गुणांनी घसरला आहे. सेन्सेक्स सध्या ७६,२९१ वर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, निफ्टीमध्ये ३००% पेक्षा जास्त घसरण नोंदली गेली आहे.
11 Feb 2025 01:34 PM (IST)
देशभरातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेची 19 वी हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. याबाबत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. या फेब्रुवारी महिन्यातच या योजनेचा 19 हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.
सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा
PM Kisan 19th Installment: कधी मिळणार 19 वा हफ्ता, कशी तपासणार लाभार्थ्यांची यादी
11 Feb 2025 01:14 PM (IST)
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील काही भाग पुढील सहा महिन्यांसाठी बंद केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा महामार्ग जड, अवजड आणि प्रवासी वाहनांसाठी बंद केला जाणार आहे. महामार्ग पूर्णपणे बंद होणार नसला तरी, काही भागातील वाहतूक नियंत्रित केली जाणार असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वेळेत मुंबई किंवा पुण्यात पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गांची माहिती असणे आवश्यक आहे. लवकरच प्रशासनाकडून अधिकृत मार्गदर्शक सूचना आणि पर्यायी मार्ग जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करण्यापूर्वी अद्ययावत माहिती मिळवणे महत्त्वाचे ठरेल.
11 Feb 2025 12:54 PM (IST)
महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चर्चेत असलेली योजना आहे. मागील वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली होती. निवडणुकीच्या पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेमध्ये सरसकट सर्व अर्जदार महिलांना पैसे देण्यात आले. मात्र निवडणुकीनंतर महिलांच्या अर्जाची छाननी सुरु झाली. यामध्ये कोट्यवधी महिला या अपात्र ठरल्या आहेत. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांच फटका बसला आहे.
11 Feb 2025 12:52 PM (IST)
रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत गतविजेता मुंबई आणि हरियाणा यांच्यात चुरशीचा सामना सुरू आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या बॅटने धमाकेदार प्रदर्शन केले. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना रहाणेने संयमी आणि प्रभावी खेळी करत शतक पूर्ण केले. त्याने १६० चेंडूत १२ चौकारांसह शतकी खेळी करत मुंबईला भक्कम स्थितीत पोहोचवले. रहाणेच्या या दमदार खेळीमुळे मुंबईने ३०० धावांची आघाडी घेतली असून संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
11 Feb 2025 12:14 PM (IST)
मुंबईतील ओशिवरा येथील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत 10 ते 12 दुकाने जळून खाक झाली आहे.
11 Feb 2025 12:14 PM (IST)
ओशिवारातील एमव्ही रोडवर आगीचं थैमान ६ ते ७ दुकाने जळून खाक झाल्याची बातमी समोर येत आहे. अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्यास सुरूवात झाली आहे.
11 Feb 2025 10:59 AM (IST)
ग्वाटेमालाच्या राजधानीपासून काही अंतरावर भीषण रस्ता अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत ५५ जणांचा मृत्यू झाला आहे. बस दरीत कोसळल्याने हा हृदयद्रावक अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे.सोमवारी (१० फेब्रुवारी) ही घटना घडली. ग्वाटेमालाच्या सार्वजनिक मंत्रालयाच्या तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, उपचारादरम्यान सॅन जुआन डी डायोस रुग्णालयात आणखी दोन प्रवाशांचा मृत्यू झाला.
11 Feb 2025 10:19 AM (IST)
चंदीगड: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दिल्लीला रवाना झाले. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज दिल्लीत पंजाबच्या आमदारांना भेटणार आहेत. या बैठकीत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि पंजाबचे आमदार देखील उपस्थित राहणार आहेत जे दिल्ली निवडणुकीसाठी वेगवेगळ्या भागात प्रचार करत होते.
11 Feb 2025 10:12 AM (IST)
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मंदिराच्या संवर्धनाच्या कामादरम्यान गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे गेल्याचे उघड झाल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे तुळजापूरातील पुजारी मंडळाने गाभाऱ्याचे नव्याने बांधकाम सुरू करण्याची मागणी जोरदारपणे लावून धरली आहे. तुळजाभवानी देवीच्या मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी 'एक स्वाक्षरी देवीच्या गाभारा संवर्धनासाठी' ही मोहीम शहरभर राबवण्यात आली असून, 5240 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आले आहे. तरीही गाभाऱ्याच्या बांधकामाबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
11 Feb 2025 09:51 AM (IST)
अमेरिकेत सोमवारी (१० फेब्रुवारी) दुपारी अॅरिझोनातील स्कॉट्सडेल विमानतळावर एक दुःखद अपघात झाला, ज्यामध्ये दोन खाजगी जेट विमानांची टक्कर झाली. या अपघातात किमान एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
11 Feb 2025 09:29 AM (IST)
राज्यात गुईलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचे आठ नवे रुग्ण सोमवारी (ता. 10) आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 192 वर पोहोचली आहे. यापैकी, एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सातवर गेली असून, त्यामध्ये सहा मृत्यू पुणे जिल्ह्यात तर एक सोलापूर जिल्ह्यातील आहे.
जीबीएसमधून पूर्णतः बरे झालेल्या 91 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, 192 पैकी 91 रुग्ण नव्याने महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांतील आहेत. तसेच, 39 रुग्ण पुणे महानगरपालिका हद्दीत, 29 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत, 25 रुग्ण पुणे ग्रामीण भागात तर उर्वरित 8 रुग्ण इतर जिल्ह्यांतील असल्याची माहिती समोर आली आहे.
11 Feb 2025 08:52 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आर्टिफिशियल इंटेलिजेंस ग्लोबल समिटमध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदी पॅरिसमध्ये होणाऱ्या एआय समिटचे सह-अध्यक्ष असतील. मात्र, या शिखर परिषदेपूर्वीच स्टारलिंकचे मालक एलोन मस्क यांच्या एका ट्विटने खळबळ उडाली आहे. खरं तर, मस्कने मायक्रोसॉफ्ट एआय खरेदी करण्याची ऑफर दिली आहे.