
Mumbai MHADA Lottery 2026 (Photo Credit- X)
सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते सोमवारी, दि. ३० मार्च, २०२६ रोजी ‘गो लाईव्ह’ समारंभाद्वारे प्रारंभ केला जाणार आहे. यानंतर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची लिंक मंडळाद्वारे दुपारी ०३.०० वाजेपासून उपलब्ध राहील. तसेच नोंदणीकृत अर्जदार देखील ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक २९ एप्रिल, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती दिनांक ३० एप्रिल, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केली जाणार आहे. आरटीजीएस/एनईएफटीद्वारे दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी दिनांक ०५ मे, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्यासाठी दिनांक ०८ मे, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक १२ मे, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत केली जाणार आहे. दि. १५ मे, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सोडत काढली जाणार असून सोडतीचे ठिकाण मंडळातर्फे नंतर जाहीर केले जाईल.
मुंबई मंडळाच्या सन २०२६ च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) १४५ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) ८५८ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) १४०८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) २२९ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे बांधकाम सुरू असलेल्या १७६२ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त ३७१ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock)म्हणून म्हाडाला प्राप्त १८८ सदनिका तसेच मुंबई मंडळाच्या मागील सोडतींमधील विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त व मंडळाच्या विखुरलेल्या ३१९ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत विकासकांकडून प्राप्त सदनिका ‘जशा आहे त्या स्थितीमध्ये’ विक्रीकरिता उपलब्ध आहेत.
म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर अनुक्रमे गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
अर्जदारांना नोंदणीसाठी व अर्ज भरण्यासाठी मोबाईल क्रमांक (आधार क्रमांकाशी संलग्न) व ई-मेल आय.डी. आवश्यक आहे. अर्जदारांना नोंदणीसाठी व पात्रतेसाठी:
१) आधार कार्ड
२) पॅन कार्ड
३) अर्जदाराने जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून मागील सलग २० वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदारांचे किमान १५ वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र (Domicile Certificate)
४) उत्पन्नाचा पुरावा म्हणून दि. ०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२५ (उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरण पत्र अथवा तहसिलदार यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला ग्राहय धरला जाईल) आवश्यक आहे. या सोडतीमध्ये समाविष्ट होण्याकरिता अत्यल्प उत्पन्न गटासाठी रुपये सहा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. अल्प उत्पन्न गटासाठी रुपये नऊ लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. उच्च उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखांहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणार्यांउचा समावेश असणार असून या गटासाठी कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे, अर्जदाराचे स्वतःचे व त्यांची पत्नी/पती यांचे दोघांचे मिळून वार्षिक नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून, जीवितार्थाचे सर्वसाधारण साधन म्हणून उत्पन्न होय. दिनांक ०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२५ या कालावधीत झालेल्या उत्पन्नाच्या प्राप्तीवरुन आयकर विवरण पत्र (Financial Year २०२४-२०२५ & Assessment Year २०२५-२०२६) अथवा तहसिलदाराचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्न पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरुपाचा उत्पन्न स्तोत्राबाबतची कागदपत्रे दाखले /पुरावे/ प्रतिज्ञापत्र / वेतन प्रमाणपत्र इ. संगणकीय प्रणालीव्दारे ग्राह्य धरली जाणार नाही /Capture केली जाणार नाही, याची विशेष नोंद घ्यावी. अर्जदार पती/पत्नी दोघांचे उत्पन्न असल्यास working Status both असे निवडून दोघांचे उत्पन्न दाखवणे आवश्यक आहे. याअनुषंगाने संगणकीय प्रणालीलमध्ये आवश्यक ते पुरावे upload करावेत. अर्ज सादर करतांना उत्पन्नाचे पुरावे चुकीचे किंवा दोघांचे उत्पन्न असतांना देखील एकाचे उत्पन्न दाखवल्याचे निदर्शनास आल्यास अर्जदाराचे सदनिका वितरण कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल व अर्जदाराने भरलेली सर्व रक्कम समपहरण करुन सदनिका मंडळाच्या ताब्यात घेवून कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास मुंबई मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.
‘अर्थ अवर’ पाळण्यास मुंबईकर निरुत्साही! पर्यावरण विषयावर प्रचंड खल, चर्चेचे ठोस कृतीत रूपांतर होईना