चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी
मुंबई : 2022 मध्ये दाखल झालेल्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात मुंबईच्या एका दंडाधिकारी न्यायालयाने फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने चोक्सीविरुद्ध वॉरंट जारी करण्यासाठी न्यायालयाकडे धाव घेतली होती.
19 एप्रिलला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले की, आरोपी मेहुल चिनुभाई चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करावा. तसेच न्यायालयाने सीबीआयला जारी वॉरंटच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे, मेहुल चोक्सीविरुद्ध इतर वॉरंट आधीच जारी आहेत. भारतीय अधिकाऱ्यांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून सध्या तो बेल्जियममध्ये कोठडीत आहे. 13000 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणात त्याच्या कथित भूमिकेची चौकशी सुरू असताना, गीतांजली जेम्सच्या व्यवस्थापकीय संचालकांना 12 एप्रिलला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली.
पीएनबी घोटाळ्यात एफआयआर दाखल होण्यापूर्वीच चोक्सीने अँटिग्वा आणि बारबुडाचे नागरिकत्व घेतले होते आणि भारतातून पळून गेला होता. सीबीआयने चोक्सीशी संबंधित कंपन्या बेझेल ज्वेलरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गीतांजली जेम्स लिमिटेडसह सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.