
राष्ट्रवादीनंतर आता शिंदे गटातील मतभेद समोर; तानाजी सावंत, सत्तार यांच्यासह प्रकाश सुर्वे संतप्त
मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाच ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट केला तर भाजपने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या चार ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट केला आहे. जवळपास अशीच स्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आहे. त्यामुळे शिंदे गटातही मतभेद निर्माण झाले आहे.
हेदेखील वाचा : Sangali Politics: सांगली जिल्ह्यात मंत्रिपदाचा दुष्काळ; महायुतीचे पाच आमदार असतानाही पदरी निराशाच
माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांच्यासोबतच आमदार नरेंद्र भोंडेकर, राजेंद्र गावित, विजय शिवतारे आणि तिसऱ्यांदा आमदार झालेले मुंबईचे प्रकाश सुर्वे चांगलेच नाराज झाले आहेत. महायुती सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पूर्ण झाला. यात भाजपचे 16 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांसह 19, शिवसेनेचे (शिंदे गट) 9 कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्र्यांना राज्यपालांनी शपथ दिली. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांना डावलण्यात आले.
गेल्यावेळी सावंत यांना आरोग्य खात्याचे मंत्री करण्यात आले होते. मात्र, यावेळी त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. त्यामुळे तानाजी सावंत चांगलेच संतापले असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेतील बंडखोरीदरम्यान एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आणि नंतर पूर्ण ठामपणे शिंदे यांच्या समर्थनार्थ उभे राहिलेल्या नेत्यांपैकी तानाजी सावंत हे एक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सावंत यांच्या मतदारसंघात आयोजित जाहीरसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी सावंत यांना पुन्हा मंत्री करण्याचे आश्वासन दिले होते.
एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द फिरवला
तानाजी सावंत यांना आमदार करा, मी नामदार करतो, असे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. मात्र, आता त्यांना मंत्री करण्याची पाळी आल्यावर शिंदे यांनी दिलेला शब्द फिरवला. त्यामुळे सावंत संतापले असल्याचे बोलले जात आहे. कोणत्याही प्रकारचे जाहीर वक्तव्य ते टाळत आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी ते नागपुरात न राहता सोमवारीच पुण्यातील बालाजीनगर येथील कार्यालयात परतले.
संघर्ष माझ्या नशिबात
शिवसेनेतील बंडखोरीच्या काळात एकनाथ शिंदे यांना साथ देणारा मी मुंबईतील पहिला आमदार होतो. माझ्या घरावर हल्ला झाला. त्यांनी माझी खूप बदनामी केली. तरीही मी चांगल्या मतांनी विजयी झालो. मी एक सामान्य व्यक्ती आहे. संघर्ष करून मी इथपर्यंत पोहोचले आहे. नोकरी करून मी माझा अभ्यास पूर्ण केला. माझ्या नशिबात संघर्ष लिहिला आहे. मला मंत्री करण्याचा विचार एकनाथ शिंदे यांनी केलाही असेल, अनेकांनाही उत्सुकता होती. त्यातील काही विद्यमान मंत्री तर काही माजी मंत्री होते. तर काही प्रभावशाली लोकांची मुले होती. मी एका सामान्य गरीब कुटुंबातील आहे, असेही प्रकाश सुर्वे यांनी म्हटले आहे.