ST Cooperative Bank Scam : एसटी बँकेतील कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन!

एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकारी बँकेतील 25 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. 2 डिसेंबर रोजी संबंधितांची बैठक होणार असून, आर्थिक अनियमितता, नोकरभरती आणि खरेदी व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ST Cooperative Bank Scam : एसटी बँकेतील  कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन!
ST Cooperative Bank Scam : एसटी बँकेतील कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन!ST Cooperative Bank Scam : एसटी बँकेतील कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन!
Published on: 
Updated on: 
  • 2 डिसेंबर रोजी संबंधितांची बैठक

  • श्रीरंग बरगेंनी घेतली सरनाईकांची भेट

  • महत्त्वाची फाईल गहाळ झाल्याची तक्रार

ST Cooperative Bank Scam : एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकारी बँकेतील सुमारे 25 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहारासह आर्थिक अनियमिततांच्या आरोपांप्रकरणी स्वतः लक्ष घालून संबंधितांवर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी बुधवारी दिले. या प्रकरणी 2 डिसेंबर रोजी संबंधितांची तातडीची बैठक घेण्यात येणार आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

श्रीरंग बरगेंनी घेतली सरनाईकांची भेट

महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी बुधवारी सरनाईक यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या चौकशीला गती देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या कष्टाच्या पैशातून उभ्या राहिलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतील कथित गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबप्रमुख या नात्याने आपण या प्रकरणात स्वतः लक्ष घालू आणि संबंधितांना कारवाई करण्यास सांगून त्यासाठी प्रयत्न करू, असे सरनाईक यांनी बरगे यांना सांगितले. बँकेतील कथित गैरव्यवहारांची चौकशी जलदगतीने पूर्ण व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी बरगे यांनी त्यांच्याकडे केली होती.

बँकेतील फर्निचर, नूतनीकरण, संगणक, वातानुकूलन यंत्रणा, सीसीटीव्ही आणि अन्य साहित्य खरेदीमध्ये सुमारे 25 कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ठरावीक कंत्राटदारांशी संगनमत करून निविदा प्रक्रियेत बनावट स्पर्धा निर्माण करण्यात आली का, याची सहकार विभागामार्फत चौकशी सुरू असून, तिला गती देण्याची मागणी करण्यात आली आहे. साहित्याचा पुरवठा होण्यापूर्वीच कंत्राटदारांना 100 टक्के आगाऊ रक्कम दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

महत्त्वाची फाईल गहाळ झाल्याची तक्रार

निविदा क्रमांक 13/2025-26 संदर्भातील महत्त्वाची फाईल गहाळ झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. कागदपत्रे नष्ट करून कथित गैरव्यवहार लपविण्याचा प्रयत्न झाला का, याची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू असून, ती जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी बरगे यांनी केली.

बँकेत सुमारे 170 कर्मचाऱ्यांची कथित नियमबाह्य भरती करण्यात आली असून, उमेदवारांकडून नोकरीच्या बदल्यात आर्थिक मोबदला घेतल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या भरतीप्रक्रियेत सहभागी अधिकारी आणि संचालकांची भूमिका तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.

बँकेची आर्थिक स्थिती कमकुवत असताना गेल्या वर्षी काही कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी 75 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जमा करण्यात आला आणि त्याच दिवशी ही रक्कम काढून काही बाह्य व्यक्तींना दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, एका बचत खात्यातून दुसऱ्या खात्यात आरटीजीएसद्वारे रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पुरावे नष्ट केल्याचा ही आरोप

या व्यवहारांनंतर बँकेच्या सॉफ्टवेअरमधील काही नोंदी हटवून पुरावे नष्ट केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व्हर, ऑडिट लॉग आणि डिजिटल बॅकअपचे फॉरेन्सिक परीक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, गरज नसताना करण्यात आलेली सुमारे १.१७ कोटी रुपयांची स्टेशनरी खरेदी आणि बँकेतील कर्मचारी व सभासदांच्या विमा खर्चातील कथित अनियमिततांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणी स्वतंत्र आर्थिक गुन्हे शाखेची चौकशी, फॉरेन्सिक लेखापरीक्षण, एफआयआर दाखल करून दोषींवर कठोर कारवाई तसेच बँकेचे आर्थिक नुकसान संबंधितांकडून वसूल करण्याची मागणी बरगे यांनी केली आहे. बँकेच्या ठेवीदारांचे हित जपण्याची गरजही त्यांनी निवेदनातून अधोरेखित केली.