मुंबई : ‘बुली बाई’ एपवर मुस्लीम महिलांची बोली लावण्याच्या प्रकरणात आश्चर्यकारक तय्थ समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात उत्तराखंड राज्यातील एका तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी या केसची मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. याचा अर्थ एक महिलाच इतर महिलांची बोली लावत होती, हे उघड झाले आहे.
मुंबई पोलिसांनी एक टीम सध्या उत्तराखंडमध्ये असून, या तरुणीला ट्रान्झिट रिमांडवर मुंबई पोलिसांच्या कोठडीत घेण्याची कारवी पूर्म करीत आहे. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर, या तरुणीला मुंबईत आणण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकरणात बंगरुळुतून अटक करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर विशाल झा याला मुंबीच्या बांद्रा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. अर्धा तास झालेल्या सुनावणीनंतर, आरोपीला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी तरुणी ही ‘बुली बाई’ एपशी संबंधित तीन अकाऊंट हँडल करीत होती. सहआरोपी असलेल्या विशालकुमारने ‘khalsa supremacist’ च्या नावाने खाते उघडले होते. मुख्य आरोपी तरुणी आणि विशाल झा हे दोघेही चांगले मित्र आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांची मैत्री झाली होती. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार हे दोघेही नावे बदलून सोशल मीडिया अकाऊंट चालवित होते. या दोघांनी शिख संघटनांच्या नावांनी काही अकाऊंट सुरु केले होते. सायबर सेलची टीम आता या सोशल अकाऊंटची चौकशी करीत आहे. तूर्तास या तरुणीचे नाव उघड करण्यात आलेले नाही.
हे सर्व प्रकरण १ जानेवारीला उघड झाले होते. या आरोपींनी अनेक मुस्लीम महिलांचे फोटो एडिट करुन ते GitHub प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या बुली बाई एपवर लिलावासाठी टाकण्यात आले होते. यात सामाजिक मुद्द्यांवर सक्रिय असलेल्या महिलांना टार्गेट करण्यात आले होते. यात काही पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला वकिलांचा समावेश होता.
हे उघड झाल्यानंतर मुंबई सायबर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी रविवारी काही अज्ञात व्यक्तींविरोओधात आयटी कायदा आणि आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. धार्मिक भावना दुखावणे, दोन धर्मांत तेढ निर्माण करणे, महिला सन्मान दुखावणे, अपराधीक मानहानी, पाठलाग करणे, इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर आपत्तीजनक मजकूर टाकणे या कलमांचा समावेश होता.
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी डॉजी एप्लिकेशनच्या डेव्हलपरबाबत गिटहब प्लॅटफॉर्मकडून माहिती मागवली आहे. तसेच ट्विटरवरुन संबंधित प्लॅटफॉर्मवरील कन्टेन्ट ब्लॉक करुन हटविण्याचे आदेश दिले आहेत. ट्विटरवर या एपबाबत सर्वात पहिल्यांदा ट्विट करणाऱ्याची माहिती, अकाऊंट हँडलरची माहिती मागवली आहे.