अमरावती : संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांनी अटीतटीच्या लढतीत विजयश्री खेचून आणली. त्यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला. सरपंच ते आमदार आणि आता खासदार असा त्यांचा 20 वर्षांतील राजकीय प्रवास आहे. पूर्वी रिपाइंचे असलेले बळवंत वानखडे यांनी दर्यापूर विधानसभा मतदारसंघात तीन वेळा आपले नशीब आजमावले.
2019 च्या निवडणुकीत त्यांना यश येऊन ते काँग्रेसच्या उमेदवारीवर दर्यापूरचे आमदार झाले. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. मतदारसंघ पिंजून काढून खासदार पदाचे यश खेचून आणले. याचे सर्व श्रेय आमदार ठाकूर यांना जाते. बळवंत वानखडे यांच्यासाठी ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली होती. कधी नव्हे तेवढे या निवडणुकीत काँग्रेसचे सर्व नेते एका व्यासपीठावर आले होते.
तसेच नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठन करून त्यांना आव्हान दिल्याने त्यांना या निवडणुकीत धडा शिकवा, असे थेट आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले होते. तर गत निवडणुकीत नवनीत राणांचा प्रचार करून माझी चूक झाली मी अमरावतीकरांची माफी मागतो. या निवडणुकीत चूक परत करू नका, असे भावनिक आवाहन मतदारांना थेट शरद पवारांनी केले होते.