Rajkot Fort News: ''शरद पवार अशा प्रकारे वक्तव्य देत असतील तर...''; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यानंतर मालवणमध्ये प्रचंड रोष निर्माण झाल्याचे पाहिला मिळत आहे. ठाकरे गटाचे समर्थक आणि राणे समर्थक आमनेसामने आले होते. राणे-ठाकरे समर्थकांमध्ये राजकोट किल्ल्यावर संघर्ष झाला. त्यानंतर दोन्हीकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. यावर आता फडणवीस यांनी भाष्य केले आहे. राजकोट येथील घटनेचे कोणी राजकारण करू नये असे ते म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राजकोट किल्ल्यावर जी घटना घडली आहे, त्यावर कोणीच राजकारण कार्य नये असे माझे मत आहे. ही अतिशय दुःखद घटना आहे. पण त्याचवेळी अशा प्रकारच्या घटनेची योग्य चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. तसेच तिथे भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे. ही घटना नौदलाने गांभीर्याने घेतली असून, यासंदर्भात चौकशी समिती स्थापन केली आहे. नौदल चौकशी करून दोषींवर कारवाई करेल. भारतीय नौदलाच्या मदतीने त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारणार आहोत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.”
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “या घटनेचे केवळ राजकारण करायचे, प्रत्येक गोष्टीत राजकरण शोधून काढायचं, प्रत्येक गोष्टीला निवडणुकीच्या चष्म्यातून पाहायचे. हे अत्यंत चुकीचे आहे. अशा प्रकारचे राजकारण त्यांनी करू नये. माझी सर्वांना विनंती आहे की, अशा घटनेचे राजकारण करणे हे महाराष्ट्राला शोभत नाही.”
🕟 4.30pm | 28-8-2024📍Nagpur | संध्या. ४.३० वा. | २८-८-२०२४📍 नागपूर.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Nagpur https://t.co/I1bnwSE3wS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 28, 2024
शरद पवारांच्या विधानावर फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले, ” शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना माहिती आहे की, हा पुतळा नौदलाने तयार केलेला आहे . हा पुतळा राज्य सरकारने तयार केलेला नाही. भ्रष्टाचाराला आपला विरोध असला पाहिजे. पवार साहेबांचा देखील विरोध असला पाहिजे. ते अशा प्रकारे वक्तव्य देत असतील तर मला आश्चर्य वाटत. ते भ्रष्टाचाराला समर्थन देतात का मग? मला वाटत ही वक्तव्ये केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केली जात आहे. पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याला अशा प्रकारचे वक्तव्य करणे शोभत नाही. ”
सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. त्यावर सध्या राजकारण तापले आहे. आज राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. त्यात बोलताना शरद पवारांनी देखील निशाणा साधला आहे. ”कुणीतरी म्हणाले वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला. तिथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झाले. आज भ्रष्टाचार किती टोकाला पोहोचला आहे. कुठे भ्रष्टाचारी भूमिका घेऊ नये याचे तारतम्य देखील सरकारमध्ये नाही”, असे शरद पवार म्हणाले.