फोटो सौजन्य सोशल मीडिया
अंकुश आणि अमित यांना छत्तीसगडमधील राजनांदगाव येथून तर ऋषभ ऊर्फ कांचा आणि रोमित यांना गुजरातमधील सूरत येथून अटक केली. अन्य तिघांना नागपुरातून ताब्यात घेतले. आरोपींकडून ८ मोबाईल आणि गोळीबारात वापरलेले पिस्तूलही जप्त केले आहेत. गोळीबारामागील मुख्य सूत्रधार आणि महिला साथीदाराचा शोध सुरू आहे.
Nagpur News : भाजप नेत्यांची हायव्होल्टेज दंगल ; डीजेवरून रंगला कलगीतुरा
त्यांनाही लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती नागपूर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.२६ ऑगस्टच्या मध्यरात्री १२.४२ वाजता नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला होता. मागे बसलेल्या व्यक्तीने घराच्या दिशेने गोळीबार केल्याचे फुटेजमध्ये आढळले.
जरिपटका परिसरातील अंगुलीमालनगर येथील सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींच्या हालचाली,संपर्क आणि संभाव्य ठिकाणांचा माग काढला. कृत्रिम बुद्धिमत्तेनेही विविध सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले.
गोळीबारानंतर ऋषभ आणि रोमित सूरतमधील हॉटेलमध्ये थांबले होते. अंकुश आणि अमित यांनी राजनांदगाव येथील हॉटेलमध्ये आश्रय घेतला होता. अंकुशविरुद्ध यापूर्वी गंभीर स्वरूपाचे ४६ गुन्हे दाखल आहेत तर ऋषभविरुद्ध १४ गुन्हह्यांची नोंद आहेत .
सुमारे १० तास आधी आरोपींची बैठक झाल्याचे समोर आले आहे. बैठकीत गोळीबाराची योजना आखली. मुख्य सूत्रधाराने अमित ठाकरे याला गोळीबाराची माहिती दिली होती. अमितने इतर आरोपींना पैसे, पिस्तूल आणि वाहन उपलब्ध करून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. घटनेच्या वेळी ऋषभ नागदिवे दुचाकी चालवत होता तर अंकुश तोमस्कर मागे बसला होता. अंकुशनेच मोटघरे यांच्या घराच्या दिशेने गोळी झाडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
विविध पथकांच्या समन्वयातून गुजरात आणि छत्तीसगडपर्यंत तपासाची सूत्रे नेऊन ७ आरोपींना अटक केली. उल्लेखनीय कामगिरीबद्दल तपास पथकाला २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. आरोपीविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याच्या दृष्टीनेही पोलिसांकडून प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्तानी दिली.






