फोटो सौजन्य AI
तर हिंदू सणांच्या तोंडावरच डीजेवर बंदी का, असा सवाल भाजपचेच विद्यमान आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे. तिकडे विश्व हिंदू परिषदेनेही डीजे बंदीला विरोध केला आहे. विहिंप म्हणते की काहीही होवो, आम्ही आमच्या सणांना डीजे वाजवणारच. तर या बंदीने डीजे व्यावसायिकांवर कुऱ्हाड कोसळणार आहे.
डीजेवरील बंदीसाठी व्यापक जनचळवळ उभारली असून, चळवळीचा पहिला टप्पा म्हणून ऑनलाईन पेटिशनद्वारे नागरिकांचा सहभाग नोंदवण्यात येत आहे. ही चळवळ कोणत्याही धर्माच्या, उत्सवाच्या किंवा समाजाच्या विरोधात नाही. मात्र, एकाच्या किंवा समूहाच्या आनंदासाठी दुसऱ्यांच्या आरोग्याशी आणि शांततेशी तडजोड होऊ नये. त्यासाठी टप्प्याटप्प्याने चळवळ चालवली जाणार आहे, असे संदीप जोशी यांनी म्हटले आहे.
आम्ही अनेक गणेश, दुर्गादेवी मंडळांकडून अग्रीम रक्कम घेऊन लाखोंचे साहित्य विकत घेतले आणि अचानक बंदी आणली तर आम्ही बरबाद होऊन जाऊ, असे डीजे-साऊंड सिस्टीम संघटनेचे म्हणाणे आहे. कारण, एका डीजे व्यावसायिकावर ३००-४०० लोक अवलंबून असतात. काम करणारी मुले, मेस वाल्या महिला, ट्रान्सपोर्टच्या गाड्या, डेकोरेशन, जनरेटर आदी व्यवसाय अवलंबून असतात.
डीजेवर बंदी आणणे, हा उपाय नाही तर यातून मध्यम मार्ग काढला पाहीजे, अशी भूमिका डीजे आणि साऊंड सिस्टम व्यावसायिक रविकांत पवनीपगार, नंदन गजेंद्रगडेकर, कमलेश भांडेकर, स्वप्निल सुले, किरण घाडोले आणि निखिल कामडे यांनी मांडली.
डीजे बंदीच्या पोलिस आयुक्तांच्या आदेशावर आमदार प्रवीण दटके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बंदीला आमचा विरोध नाही, मात्र, हा आदेश फक्त हिंदूंच्या सणांच्या आधीच का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. इतर जाती-धर्माच्या सणांच्या वेळी असा आदेश का काढला गेला नाही, असा थेट सवाल त्यांनी पोलिस प्रशासनाला केला आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पोलिस आयुक्तांनी हे परिपत्रक मागे घ्यावे, अशी मागणी आमदार दटकेंनी केली आहे.
ईदपूर्वी डीजे बंदी करा, अशी मागणी पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना आम्ही केली होती. त्यावेळी कोणतीही पावले उचलली नाही. आता हिंदू सणांपूर्वीच डीजे बंदी केली. याला आमचा विरोध आहे, असे विश्व हिंदू परिषद नागपूरचे मंत्री अमोल ठाकरे यांनी म्हटले आहे. गुन्हे दाखल झाले तरी चालेल, पण सहा तारखेला जन्माष्टमीला शोभायात्रेत डीजे वाजवणारच, असे त्यांनी ठणकावून सांगितले.






