कामात हलगर्जी करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांना नरेश म्हस्के यांनी झापले, भाईंदर आणि मिरारोड स्थानकाच्या सोयीसुविधांवर विशेष लक्ष
रेल्वे प्रवास सुखकर करण्याऐवजी कामात हलगर्जीपणा करत प्रवाशांच्या अडचणी वाढवणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांना ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी चांगलेच धारेवर धरले. अचानक ट्रेन रद्द करणे, नियमित गाड्या बंद करून त्याजागी वातानुकूलित रेल्वे सुरु करणे, अस्वच्छ स्वच्छतागृहे व विश्रामगृहे, तसेच खासदारांना विश्वासात न घेता विकासकामे सुरू करणे या मुद्द्यांवर त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यापुढे मतदारसंघातील विकासकामांची माहिती खासदारांना वेळेवर मिळावी यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आश्वासन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.
गुरुवार, 24 एप्रिल रोजी पश्चिम रेल्वे अंतर्गत येणाऱ्या स्थानकांसाठी खासदारांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस खासदार नरेश म्हस्के, रविंद्र वायकर, वर्षा गायकवाड, अनिल देसाई, स्मिता वाघ, उमेशभाई पटेल, शोभा बच्छाव तसेच रेल्वेचे जीएम अशोक कुमार मिश्रा, डीआरएम पंकज सिंग आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
एक घोट पाणी मिळणं देखील कठीण…कर्जतमधील ‘या’ गावात चक्क 15 दिवसापासून पाण्याचा थेंबही नाही
या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी भाईंदर आणि मिरारोड स्थानकांवरील समस्यांकडे लक्ष वेधले. त्यांनी प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सूचना मांडल्या. भाईंदर पश्चिमेकडील ॲक्सिलेटरचे काम पूर्ण झाले असून, त्याचे उद्घाटन लवकरच होणार आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेता प्लॅटफॉर्म 3/4 वर ॲक्सिलेटर, प्लॅटफॉर्म 5 वर लिफ्ट आणि ॲक्सिलेटर, तसेच 4 आणि 5 दरम्यान अतिरिक्त प्लॅटफॉर्म (4-लाइन बॉक्स) तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाईंदर हे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्यामुळे येथे अधिक लोकल गाड्या सुरू कराव्यात, असे त्यांनी सुचवले. याशिवाय, बोरिवली ते डहाणू रोड पर्यंत तिसरी-चौथी लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, प्लॅटफॉर्म बांधणीसाठी आवश्यक असलेली जागा एका बिल्डरच्या करारामुळे रेल्वेच्या ताब्यात नाही. यामुळे लिफ्ट आणि ॲक्सिलेटर बसवणे अडचणीत आले आहे. या संदर्भातील कागदपत्रे खासदारांनी अधिकाऱ्यांना सादर करण्याची तयारी दर्शवली.
मीरा रोड पश्चिम येथे नवीन प्लॅटफॉर्मसाठी किमान १० मीटर रुंदी ठेवण्याची आणि भिकाऱ्यांपासून स्वच्छता राखण्याची सूचना देखील त्यांनी केली. प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट खिडक्यांची संख्या वाढवावी, साखळी पद्धतीने लोकल गाड्या चालवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदनही दिले. त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर आणि विधानसभा प्रमुख विक्रम प्रतापसिंह उपस्थित होते.