नरेश म्हस्के यांची उबाठावर घणाघाती टीका (फोटो सौजन्य-X)
मुंबई : काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर देशावर संकट कोसळले आहे. महाराष्ट्रातून काश्मीर गेलेल्या हजारो पर्यटकांना सुखरुप आणण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. मात्र या राष्ट्रीय संकटात ठाकरे परिवार परदेशात सुट्ट्या एन्जॉय करतोय, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
बाळसाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार म्हस्के म्हणाले की, पंतप्रधान परदेश दौरा सोडून मायदेशात आले. अमित शाह पहलगाममध्ये पोहोचले. श्रीनगरमध्ये मदतीची वाट पाहणाऱ्या मराठी पर्यटकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथे पोहोचले तर तुम्हाला मिर्च्या का लागल्या? तेथील पर्यटकांसाठी तुम्ही पाण्याची बाटली तरी पाठवली का? असा सवाल खासदार म्हस्के यांनी संजय राऊत यांना केला. मराठी अस्मिता, महाराष्ट्र हिताची भाषा करणारे का नाही परदेश दौरा सोडून आले, असा टोला त्यांनी उबाठाला लगावला. एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये मदतीसाठी गेले तुमच्या नेत्यांसारखे युरोपात थंड हवेच्या ठिकाणी नाही गेलेत, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.
महाराष्ट्रातून पर्यटनासाठी गेलेल्या शेकडो पर्यटकांसाठी सरकारकडून व्यवस्था केली जात आहेत. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: श्रीनगरमध्ये दाखल झाले. आपतकालीन परिस्थितीत काम करण्याचा अनुभव असल्याने शिंदे स्वत: पर्यटकांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या परतीच्या प्रवास जलद व्हावा यासाठी काम करत असल्याचे नरेश म्हस्के सांगितले.
शिवसेनेच्या माध्यमातून बुधवारी ७५ पर्यटक विशेष विमानाने महाराष्ट्रात सुखरुप परतले. आज दोन विशेष विमानांमधून जवळपास २७० पर्यटक मुंबईत परत येतील. यात वर्धा नागपूर येथील ४५ पर्यटकांचा समावेश आहे. जे मागील दोन दिवस सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते, त्यांना परत आणण्याची व्यवस्था केल्याची माहिती खासदार म्हस्के यांनी दिली. यापूर्वी इरशाळ गडाची दुर्घटना, कोल्हापूरचा महापूर, केरळचा पूर असो अशा नैसर्गिक आपत्तीवेळी एकनाथ शिंदे नागरिकांना मदत करण्यासाठी घटनास्थळावर पोहोचले होते.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार शिंदे यांच्यावर आहेत. लोकांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे त्यामुळेच ते श्रीनगरला गेले, असे खासदार म्हस्के म्हणाले. दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटक मृत्यूमुखी पडले आणि संजय राऊत हिंदु मुस्लिम करतात आणि पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या राजीनामा मागतात, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. पाकिस्तान आणि ‘आयएसआय’ची भाषा बोलणाऱ्या संजय राऊत याची चौकशी करायला हवी, अशी मागणी खासदार म्हस्के यांनी केली.
सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहणारे उबाठाचे खासदार खोटारडे
केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे पाठ फिरवणारे उबाठाचे खासदार अरविंद सांवत आणि संजय राऊत हे खोटारडे आहेत, असे खासदार म्हस्के म्हणाले. दुर्गम भागात दौरा असल्याचे खोटं कारण देऊन अरविंद सावंत बैठकीला अनुपस्थित राहिले तर संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली मग ते कुठल्या दुर्गम भागात गेलेत की ते राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर बैठकीस उपस्थित राहू शकत नाहीत, असा सवाल खासदार म्हस्के यांनी उपस्थित केला. या कृतीतून उबाठा खासदारांचा खोटा चेहरा समोर आला, असे ते म्हणाले.