Nashik Rainfall News:
Nashik Rainfall News: मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रानंतर आता उत्तर महाराष्ट्रातही पावसाचे थैमान घालायला सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २८) मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला. अनेक तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला तालुक्यातही जोरदार पावसाचा तडाखा बसला असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई दौरा तातडीने रद्द करत आपल्या मतदारसंघाकडे धाव घेतली आहे. भुजबळ येवला मतदारसंघातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. येवला तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना तातडीने मदतकार्य मिळावे यासाठी भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गावोगावी पोहोचून आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यकर्त्यांनी विविध गावांमध्ये जाऊन मदतकार्य सुरू केले आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी संपर्क साधत प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यातील पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत, असे त्यांनी सांगितले. यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसील व पोलिस ठाण्यांमध्ये तातडीने नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पूरपरिस्थितीत अडकलेले नागरिक व जनावरे सुरक्षित स्थळी हलविण्यात यावीत, असेही आदेश भुजबळांनी प्रशासनाला दिले आहेत.
महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन; मुलगा सत्याने शेअर केली भावूक पोस्ट
यासोबतच संकटात अडकेल्यांसाठी मदत कक्षाचे दूरध्वनी क्रमांक तात्काळ सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांमधून जनतेपर्यंत पोहोचवावेत, जिल्ह्यात काही ठिकाणी पूरामुळे तात्पुरती बेटे निर्माण झाली असून अशा भागात अडकलेल्या नागरिकांचीही तातडीने सुटका करावी, आवश्यकतेनुसार एनडीआरएफ किंवा एसडीआरएफ पथकांना पाचारण करावे, असेही आदेशही भुजबळांनी प्रशासनाला दिले आहेत.
अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्या कुटुंबांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मोफत धान्य व मदत रक्कम तातडीने वाटप करण्यात यावी, पूरबाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, तसेच ज्या भागात जीवितहानी किंवा पशुधनाचे नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात यावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. जखमी नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
यासोबतच शेतीपिके, घरे आणि पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान त्वरित नोंदवून पंचनामे करण्यास सुरुवात करावी, सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच दूरध्वनी सेवा, रस्ते, वीजपुरवठा यांसारख्या जीवनावश्यक सेवा तातडीने पूर्ववत करण्यास संबंधित विभागांना आदेश दिले.
आपत्कालीन सेवांसाठी सर्व विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात याव्यात, सोमवारी लहान मुलांच्या शाळा आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील एकूण परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.