नाशिक: गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिंदे गटाकडून मिशन टायगर सुरू असल्याची चर्चा आहे. या अंतर्गत ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार फोडण्याची तयारीही सुरू असल्याचे बोलले जात आहे. हे सुरूअसतानाच नाशिकमध्ये काँग्रेसला पहिला धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यामुळे काँग्रेसच्या हेमलता पाटील चांगल्याच नाराज होत्या. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर, ठाकरे गटाच्या माजी उपमहापौर रंजना बोराडे आणि दीपक दातीर यांनीही शिवसेनेत प्रवेश घेतल्याने ठाकरे गटासाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
हेमलता पाटील, रंजना बोराडे आणि दीपक दातीर यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशाने काँग्रेस आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. हा प्रवेश सोहळा नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून हेमलता पाटील काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाने काँग्रेसच्या गोटातील महत्त्वाचा नेता आपल्या बाजूला खेचला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत. दोन महिन्यांपूर्वी जॉय कांबळे यांनीही काँग्रेस सोडली होती. त्यामुळे काँग्रेसच्या संघटनेतील विस्कळीतपणा अधिक स्पष्ट होत आहे. हेमलता पाटील, रंजना बोराडे आणि दीपक दातीर यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशाने नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाला एकाच वेळी मोठा धक्का बसला असून, शिंदे गटाने आपल्या ताकदीत आणखी वाढ केली आहे.
ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि युवासेना जिल्हाप्रमुख दीपक दातीर यांच्या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठे नुकसान झाले आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के, विधान परिषद उपसभापती नीलमताई गोहे, मंत्री प्रताप जाधव, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
लाडकी बहीण योजनेचा फटका शेतकऱ्यांना; ठिबक सिंचन योजनेचे सरकारकडे कोट्यवधी रुपये थकले
“शिंदे यांची काम करण्याची पद्धत विलासराव देशमुख यांच्यासारखी”
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हेमलता पाटील म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांची काम करण्याची पद्धत ही माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यासारखी आहे. शिवसेनेत प्रवेश करताना मी एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणतेही आश्वासन घेतले नाही. एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत पाहिली की विलासराव देशमुख यांची आठवण येते. विलासराव देशमुख कायम कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असायचे, एकनाथ शिंदे हेदेखील त्यांच्याप्रमाणे कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असतात. अशाच व्यक्तीच्या हाताखाली आपण काम केलं पाहिजे, त्यामुळेच मी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.”