ncp sharad pawar in mumbai
मुंबई : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्याचे वातावरण तापले आहे. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले होते. नौदलाकडून उभारण्यात आलेला हा पुतळा समुद्रकिनारी असलेल्या वाऱ्यामुळे पडला असे स्पष्टीकरण देण्यात आले. यावरुन शिवप्रेमींनी रोष व्यक्त केला होता. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन केले. हुतात्मा पुतळ्यापासून गेट वे ऑफ इंडिया पर्यंत महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांनी आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यावर जेष्ठ नेते शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राजकोट किल्ल्यावर झालेल्या दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे. मुंबई दौऱ्यावर असताना जाहीर कार्यक्रमामधून नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व शिवप्रेमींची माफी मागितली. यानंतर देखील महाविकास आघाडीने मुंबईमध्ये हे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, जेष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, नाना पटोले यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील पायी चालत आंदोलनामध्ये सहभाग घेतला. शरद पवार हे अनवाणी चालताना सुद्धा दिसले. त्यांच्या पायाला पट्टी बांधलेली असून देखील शरद पवार आंदोलनामध्ये सहभागी झाले. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हे विधान धक्कादायक
शरद पवार म्हणाले, “मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. सध्याच्या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम केलं आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे कोसळला अशा प्रकारचे विधान हे धक्कादायक आहे,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
हा संपूर्ण शिवप्रेमींचा अपमान
पुढे शरद पवार म्हणाले, “गेट वे ऑफ इंडियाच्या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या ५० वर्षांपासून लोकांना प्रेरणा देत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये असे अनेक पुतळे आहेत. पण मालवणमध्ये उभारलेला पुतळा भ्रष्ट्राचाराचा नमुना होत आहे. राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या उभारणीमध्ये भ्रष्ट्राचार झाला हा जनमाणसांमध्ये समज निर्माण झाला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे. तसेच संपूर्ण शिवप्रेमींचाही अपमान आहे. त्यामुळे हा अपमान करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.