म्हणून मोदींना ते पाप करता आलं नाही': शरद पवारांची जामनेरमधून घणाघाती टीका
लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचं पाप पंतप्रधान मोदींच्या मनात होतं. मात्र केवळ ५ खासदार असलेल्या विरोधी पक्षांच्या ४८ पैकी ३१ जागा निवडून दिल्या, त्यामुळे मोदींना हे पाप करता आलं नाही. त्यामुळे यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला बदल करायचा आहे. हे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही, असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज मांडलं.
यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि भाजपवरही टीका केली. ‘मोदींच्या मनात असलेली घटनादुरुस्ती त्यांना करता येऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. घटना बदल करता येऊ नये म्हणून वाटेल ते करायचा निश्चय इंडिया आघाडीतील पक्षांनी केला, असंही पवार यावेळी म्हणाले.
खानदेशात कापूस पिकत असतानाही केंद्र सरकारने परदेशातून कापूस आणण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना फसवण्याचं काम सरकारमधल्या लोकांनी केलं आहे. कार्यकर्ता काम घेऊन गेला तर त्याला दम दिला जातो. मात्र, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात, याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला. जामनेरमधील एकही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. या प्रकल्पांसाठी जमीन घेतल्या होत्या त्यांना त्याची किंमतसुद्धा अजून मिळालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा–Manipur Attack : मणिपूरमध्ये उग्रवाद्यांचा CRPF कॅम्प, पोलीस ठाण्यावर हल्ला; घरं पेटवली, ११ ठार
लोकसभा निवडणुकीत चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांना सोबत घेत सरकार स्थापन करून भाजपने काय केलं? कोणते निर्णय घेतले? असा सवाल त्यांनी केला. देशातील शेतकऱ्यांची, तरुणांची काय अवस्था आहे? एका वर्षात 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला भाव मिळत नाही आहे, जो माल पिकवतो त्यालाच त्याच्या उत्पादनानुसार मोबदला दिला जात नाही, अशी टीका त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० पार चा नारा दिला होता. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला केंद्रात बहुमत मिळालं होतं. शिवाय लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी अयोध्येत राम मंदिराची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला होता. त्यातच ४०० च्यावर जागा निवडणून येतील असा विश्वासही होता. त्यामुळेच भाजपने २०४७ चं मिशन ठेवलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने आणि कॉंग्रेसनेही चांगलं प्रदर्शन केलं. इंडिया आघाडीला २३५ तर कॉंग्रेसला ९९ जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपचं ४०० पारचं स्वप्न भंग झालं.
याच दरम्यान राज्यघटना बदलण्याबाबत काही विधान भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. त्यामुळे भाजपला जर ४०० पार जागा मिळाल्यात तर राज्यघटना बदलली गेली असती, असा विरोधकांचा आरोप आहे. त्यावर आज शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली.