
नवले पुलावरील अपघातांचा मुद्दा लोकसभेत; सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर गडकरींनी दिलं आश्वासन
सुप्रिया सुळे यांची मागणी
कोल्हापूर–पुणे मार्गावरील नऱ्हे परिसरात वारंवार अपघात होत असल्याने हा प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज असल्याचे सुळे यांनी सांगितले. “आपण दिल्लीतून पथक पाठवले, काही अपघातांचे प्रमाण कमी झाले; तरीही दुर्घटना सुरूच आहेत. कंत्राटदारांना काळ्या यादीतही टाकले, मात्र काम पूर्ण कधी होणार? नऱ्हे भागात शून्य अपघात कसे साध्य होणार?” असा थेट सवाल त्यांनी गडकरींना केला.
गडकरींचे उत्तर
“पुणे–कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, पुणे–सातारा हा टप्पा रिलायन्सकडे होता. ते कंत्राट रद्द केले आहे. अभ्यास समिती नेमली असून, वेस्टर्न बायपासच्या संदर्भातही काम सुरू आहे. सहा हजार कोटींचा डीपीआर मंजूर करण्यात आला आहे. खंबाटकी घाटातील बोगद्यांचे काम सुरू असून, सातारा–कोल्हापूर टप्प्यावरील अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे,” असे गडकरी यांनी सांगितले. तसेच, “एक वर्षाच्या आत संपूर्ण प्रकल्प पूर्ण केला जाईल,” असे आश्वासनही त्यांनी दिले.
पुण्यातील नवले पुलाजवळील दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ गेल्या काही दिवसाखाली एक हृदयद्रावक आणि मोठी दुर्घटना घडली आहे. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एका अवजड कंटेनरचे नवले ब्रिजवर अचानक ब्रेक फेल झाले. यामुळे सहा ते सात गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक बसली आणि त्यापैकी दोन वाहनांना भीषण आग लागली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे, या घटनेमुळे नवले पुलावरील अपघातांचा मुद्दा पुन्हा एका लोकसभेत उपस्थित केला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबियांसाठी ५ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. पुण्यातील नवले पूल हा सातत्याने अपघातांचे केंद्र ठरत आला आहे.