मागील सरकारमधील लाडकी बहीणसह इतर योजना बंद होणार का? मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं मोठं विधान
नागपूर : राज्यात यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात असलेल्या महायुती सरकारने अनेक योजना सुरू केल्या होत्या. यातील लाडकी बहीण योजनेसह काही योजना बंद होणार अथवा काही निकष लावले जाणार असे म्हटले जात होते. मात्र, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. ‘महायुतीने सुरू केलेली कोणतीही योजना बंद केली जाणार नाही’, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिले आहे.
हेदेखील वाचा : माजी मंत्री छगन भुजबळ यांचे स्पष्ट आहे म्हणणं; नाही मी कोणाच्या हातातील खेळणं…
नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. महायुती सरकारने पुरवणी मागण्यांतर्गत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ही योजना बंद केली जाईल, असा दावा विरोधक सातत्याने करत होते. मात्र, आता फडणवीस यांनी ते पूर्णपणे फेटाळून लावले आहे.
लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता 21 नंतर
लाडकी बहीण योजनेबाबत कुणालाही शंका नसावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. लाडकी बहीण योजनेंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. फडणवीस म्हणाले, मला या सभागृहाला खात्री द्यायची आहे की, हे अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होईल. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बाहिणींनी महायुतीला पूर्ण आशीर्वाद दिला आहे. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या आश्वासनावर मागे हटणार नाही.
लोकांचा ‘एक है तो सेफ है’ला पाठिंबा
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ असा नारा दिला होता. या घोषणेला राज्यातील जनतेने जोरदार पाठिंबा दिला आणि महायुती 237 जागा जिंकण्यात यशस्वी ठरली. समाज एकसंध राहिला तर आपण पुढे जाऊ शकतो. राज्यघटना नष्ट करण्याच्या विरोधकांच्या खोट्या कथनाला महाराष्ट्रातील जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. आता विरोधकांकडे काही बोलायला नाही.
मी आजचा अभिमन्यू
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेली पाच वर्षे महाराष्ट्रासाठी परिवर्तनाची वर्षे होती. मला वैयक्तिकरित्या आणि माझ्या कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले. 5 ते 7 लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकाच व्यक्तीशी बोलतात. पण मी आजचा अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसा भेदायचा हे मला माहीत आहे. यामुळेच आमची महायुती पुन्हा एकदा विक्रमी बहुमताने सत्ता मिळवण्यात यशस्वी झाली.
हेदेखील वाचा : Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचं थेट PM नरेंद्र मोदी आणि CM फडणवीसांना पत्र; पत्रात नक्की काय? वाचा सविस्तर