अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिली एक वर्षाची मुदतवाढ; प्रताप सरनाईक yयांची पहिली प्रतिक्रिया
अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मराठी शिकण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ दिली. या कालावधीत मराठी न शिकल्यामुळे संबंधित चालकांवर कारवाई केली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्रात राहायचे असेल आणि येथे व्यवसाय करायचा असेल तर प्रत्येकाने किमान जुजबी मराठी शिकणे आवश्यक आहे. पूर्वी नोटीस दिल्यानंतर एका महिन्यात मराठी शिकण्याची तरतूद होती. मराठी बोलता न आल्यास पुढील तीन महिन्यांपर्यंत परवाना रद्द करण्याची प्रक्रिया लागू होऊ शकत होती.
मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक वर्षाची मुदत दिल्याने त्या निर्णयाचे पालन केले जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. या एक वर्षाच्या कालावधीत चालकांनी जुजबी मराठी शिकावी आणि त्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठी शिकण्याचा आणि बोलण्याचा नियम 1989 पासून अस्तित्वात असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आतापर्यंत 36 वर्षे या नियमाच्या अंमलबजावणीसाठी प्रतीक्षा केली आहे. त्यामुळे आणखी एक वर्षाची मुदत मिळाली तरी त्यात काही गैर नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत 1 लाख 60 हजार अमराठी चालकांनी जुजबी मराठी शिकल्याची माहिती दिली. त्यापैकी सुमारे 20 ते 30 हजार चालकांनी कांदिवली येथे आयोजित कार्यक्रमात मराठी भाषा शिकल्याचे प्रमाणपत्र घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठीचा व्यवहारातील वापर वाढावा आणि अन्य भाषिकांमध्येही मराठी भाषेचा प्रसार व्हावा, यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतल्याचे शिंदे यांनी नमूद केले.






