कोरोनाने चिंता आणखी वाढवली; गेल्या 24 तासांत 'इतक्या' रुग्णांची वाढ
मुंबई : 2020 मध्ये कोरोना व्हायरसने भारतातच नाहीतर जगभरात हाहा:कार माजवला होता. त्यानंतर देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. देशभरात आतापर्यंत 1000 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 752 रुग्णांची गेल्या पाच-सहा दिवसांत नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 209 रुग्ण आढळले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 69 रुग्ण आढळले.
सध्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळमध्ये आतापर्यंत ४३० कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर महाराष्ट्रात २०९, दिल्लीत १०४, उत्तर प्रदेशात १५, पश्चिम बंगालमध्ये १२, गुजरातमध्ये ८३ व कर्नाटकात ४७ सक्रीय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. दिल्लीत गेल्या एका आठवड्यात ९९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिल्ली, मुंबई व केरळसह देशभरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, महाराष्ट्र, दिल्ली व केरळमधील नागरिकांची चिंता वाढलेली असताना काही राज्ये व केंद्रशासित प्रदेश अद्याप कोरोनापासून चार हात लांब आहेत. अंदमान व निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीरमध्ये अद्याप एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.
सर्वाधिक रुग्ण मुंबईत
सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६९ रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबई ३७, ठाणे महापालिका १९, नवी मुंबई महापालिका ७, पुणे महापालिका २ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, लातूर महापालिका, रायगड, कोल्हापूर प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात १ जानेवारी ते २६ मेपर्यंत कोरोनाच्या ७ हजार ८३० संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३६९ रुग्णांना कोरोनाचे निदान झाले. त्यात मुंबईत सर्वाधिक २८५ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या २७८ असून, ८७ रुग्ण बरे झाले आहेत.