
KDMC च्या शाळेत रद्दी म्हणून सापडली जुनी मतदार ओळखपत्रे, पाच BLO ना कारणे दाखवा नोटिस
कल्याण-पिसवली येथे मिळून आलेली मतदार ओळखपत्रे ही जुनी आहेत. त्याचा मतदानासाठी वापर होणे याची एक टक्काही शक्यता नाही. या प्रकरणी ५ बीएलओना नोटिस पाठविण्यात आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत, अशी माहिती कल्याण मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली आहे.
अधिकारी गुजर यांनी सांगितले की, ७२० जुनी मतदार ओळखपत्रे मिळून आली. त्यापैकी ६७९ मतदार ओळखपत्रे ही २००६ ते २०१४ साल दरम्यानची आहेत. ४१ स्मार्ट कार्ड ही २०१७ ते २०२१ कालावधीतील आहे. ही बाब कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षणाधिकारी आणि ठाणे महापालिकेचे दिवा विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना अवगत केले आहे. ५ बीएलओंना कारणे दाखवा नोटिस बजाविली आहे. कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या नेतिवली येथील शाळेत ही मतदार ओळखपत्रे रद्दी म्हणून ठेवली होती. रद्दी एका गोणीत भरुन एका टेम्पोतून दुसरीकडे नेली जात होती. त्यापैकी एक गोणी पिसवलीनजीक पडली. त्या गोणीत ही ओळखपत्रे होती. त्यात गोणीत काही विद्यार्थ्यांचे शालेय निकालही होते. त्यामुळे ही ओळखपत्रे गोणी कुठून कोठे नेली जात होती. याचा पत्ता लागला असून या प्रकरणी ५ बीएलओना नोटिस पाठविण्यात आली आहे.