Additional Commissioner inspect city for Sant Tukaram Maharaj and Sant Dnyaneshwar Maharaj Ashadhi Wari 2025
नीरा : संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा परतीचा प्रवास करत आहे. आज हा सोहळा नीरा नदीच्या ब्रिटिशकालीन पुलावर आला असता सोहळ्यातील कारभारी आणि वारकरी यांच्यामध्ये वाद झाला. या वादामध्ये वारकऱ्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथापुढे ठिय्या मांडून सोहळा अडवून धरला. जवळपास एक तास हा सोहळा अडवून धरण्यात आला होता. वारकऱ्यांना समजूत घालून बाजूला करण्यात आले. मात्र यानंतर वारकऱ्यांना तेथेच ठेवून माऊलींचा पालखी रथ दुपारच्या विसावासाठी निरेकडे निघून गेला.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये नीरा नदीमध्ये परतीच्या प्रवासामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घातल्यानंतर या पादुका रथा पुढील आणि रथामागील दिंडीतील वारकऱ्यांना दर्शन देण्यासाठी नेल्या जातात. संपूर्ण वारी सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली याच ठिकाणी या सोहळ्यात चालणाऱ्या वारकऱ्यांच्या भेटीला स्वतः जात असतात अशी ही परंपरा आहे. परंतु आज सकाळी साडेनऊ वाजता माऊलींच स्नान झाल्यानंतर सुरुवातीला रथ पुढील वारकऱ्यांना माऊलींचे स्पर्शदर्शन देण्यात आले. रथा पुढील वारकऱ्यांच्या समोर माऊलींच्या पादुका घेऊन जाण्यात आल्या मात्र रथामागील जे दिंडीकरी वारकरी होते यांना मात्र दर्शन न देता माऊलींचा पादुका रथामध्ये मांडण्यात आल्या. मात्र यानंतर रथामागील वारकरी संतप्त झाले आणि त्यांनी माऊलींच्या रथाफुढे ठिय्या मांडला.
कारभाऱ्यांनी बसलेल्या वारकऱ्यांना त्या ठिकाणाहून उठण्यासाठी सांगितले, त्यांच्यावर दबावही टाकण्याचा प्रयत्न केला मात्र वारकऱ्यांनी तिथून न हटण्याचा निर्धार केला. यानंतर कारभाऱ्यांनी या पादुका दर्शनासाठी आणतो, तुम्ही उठा! आणि पाठीमागे जा!!, असं सांगितलं. कारभाऱ्यांनी या पादुका रथातून काढून रथाच्या मागे घेऊन ते उभे राहिले. मात्र ते उभे असलेल्या वारकऱ्यांसमोर गेलेच नाहीत. रथाच्या मागे ते उभे राहून या ठिकाणीच या आणि दर्शन घ्या ,अशी अडेल तट्टूची त्यांनी भूमिका घेतली. वारकरी सुद्धा परंपरेप्रमाणे पादुका आमच्या इकडे आणा आम्ही दर्शन घेतो असा आग्रह धरला.मात्र कारभाऱ्यांनी या वारकऱ्यांचं न ऐकता पादुका पुन्हा रथामध्ये ठेवल्या आणि हा रथ निराकडे मार्गस्थ झाला. मात्र यानंतर रथामागील वारकऱ्यांनी जागेवर उभे राहून या घटनेचा निषेध नोंदवला.पालखी सोहळा पुढे गेल्यानंतर एक तासानंतर तिथून मार्गक्रमण केलं आणि विसाव्याच्या ठिकाणी पोचले. वाल्हे पर्यंत पालखी सोहळा जात असताना या सोहळ्याच्या बरोबर न जाता एक तास पाठीमागून जाण्याचा निर्णय या वारकऱ्यांनी घेतला आहे. या घटनेचा निषेध म्हणून वारकरी रथा बरोबर न चालता रथाच्या मागे एक तासाने चालणार आहेत.