राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खिर्डी या छोट्याशा गावातील भरत जाधव या तरुण शेतकऱ्याने टाकळीभान येथील उपबाजार समितीमध्ये विष प्राशन केल्याची घटना घडली आहे.
२५ टन कांदे घेऊन भरत जाधव हा टाकळीभान येथील उपबाजार समितीमध्ये विकण्यासाठी गेला होता. अडत्याकडे त्याने कांदा दिल्यानंतर त्याला फक्त एक रुपया किलोचा भाव मिळाला. यामुळे भारत निराश आणि हताश झाल्याने त्याने बाजार समितीमध्येच विष प्राशन केल्याची घटना घडली आहे.
बाजार समितीमध्ये विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली होती. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी भरतला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. विष प्राशन केल्यानंतर त्याला इतर सहकाऱ्यांनी श्रीरामपूर येथील साखर कारखान्याच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी त्याची मृत्यूशी झुंज चालू आहे.
शेतकऱ्यांना पिकांना मिळत असलेल्या कमी भावामुळे अनेक शेतकरी अशाप्रकारे आपले जीवन संपवत आहेत. मात्र, राज्यात सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून हनुमान चालीसा भोंगे आणि धर्म यावरच राजकारण सुरू आहे. शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. डोक्यावर असलेल्या कर्ज घरातील इतर समस्या कशा सोडवायच्या असा मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे.