कास पुष्प पठारावर शनिवार-रविवारी एकेरी वाहतूक; 31 ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीत बदल
साताऱ्याकडून कास पुष्प पठार, कास धरण आणि बामणोलीकडे जाणारी वाहतूक साताऱ्यावरून घाटाईदेवी मंदिर फाटा, वाहनतळ क्रमांक १ मार्गे कास धरण व बामणोलीकडे वळविण्यात येणार आहे.
कास पुष्प पठारावर शनिवार-रविवारी एकेरी वाहतूक; 31 ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीत बदल
Follow Us
Follow Us:
सातारा : कास पुष्प पठारावरील फुलांचा बहर पाहण्यासाठी पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातारा पोलिसांनी कास परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. शनिवार, रविवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी कास पुष्प पठार परिसरात एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३४ अन्वये याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. ही वाहतूक व्यवस्था १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
अधिसूचनेनुसार, साताऱ्याकडून कास पुष्प पठार, कास धरण आणि बामणोलीकडे जाणारी वाहतूक साताऱ्यावरून घाटाईदेवी मंदिर फाटा, वाहनतळ क्रमांक १ मार्गे कास धरण व बामणोलीकडे वळविण्यात येणार आहे. तर बामणोली व कास धरणाकडून साताऱ्याकडे येणारी वाहतूक कास धरणाच्या बाजूने वाहनतळ क्रमांक २, कास पुष्प पठार मार्गे साताऱ्याकडे येईल. अशा प्रकारे दोन्ही दिशांची वाहतूक स्वतंत्र मार्गाने वळवून कास परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू असल्याने शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. सातारा-बामणोली तसेच कास धरणाकडे जाणारा मार्ग कास पठारावरून जात असल्याने वाहनांची संख्या वाढल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे पर्यटक आणि वाहनचालकांना होणारा त्रास टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतूक वळविण्यात आलेल्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, नागरिक व वाहनचालकांनी वाहतूक मार्गातील बदलांची नोंद घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.