
Raigad News: पोलिसांच्या मदतीने सेटलमेंटचा डाव? भरत गोगावलेंवर ओझर्डेंचा गंभीर आरोप
Raigad News: उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर, विकास गोगावले हे सुशांत जाबरे यांच्याबरोबर सेटलमेंट (समेट) करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाचे महाड विधानसभा मतदार संघाचे समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
२ डिसेंबर रोजी महाड नगरपालिका मतदान प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होण्याची घटना घडली होती. या घटनेत एक पिस्तुलही (जे सुशांत जाबरे यांच्या अंगरक्षकांचे होते) समाविष्ट आहे. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत. दोन्ही गटातील काही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसून ते अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करीत आहेत. दोन्ही राजकीय पक्षांचे गट सत्ताधारी असल्याने या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही सोमनाथ ओझर्डे यांनी केला.
हेही वाचा: रायगड मिलिटरी स्कूलच्या सहकार्याने आयोजन; ताकद आणि आत्मविश्वासाचे प्रभावी प्रदर्शन
आता विकास गोगावले हे सुशांत जाबरे यांच्याशी सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नात आहेत. एकमेकांवरचे गुन्हे मागे घेतले गेले तरी आपल्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील कायदेशीर लढा आपण सुरूच ठेवणार असल्याची स्पष्टोक्ती देखील सोमनाथ ओझर्डे यांनी केली. सेटलमेंट करण्याच्या या प्रयत्नांना काही पोलीस अधिकारी देखील त्यांना मदत करीत असल्याचा दावा देखिल सोमनाथ ओझर्डे यांनी केला.
या सर्व प्रकरणात विकास गोगावले यांनी काहीही केलेले नाही, असे मंत्री भरत गोगावले सांगत असतील तर त्यांनी आपल्या मुलाचा कान पकडून पोलिस ठाण्यात न्यायला हवे, गोगावले कुटुंब वर्षाखेरीस एकत्रपणे फिरायला जात असते, ते कुठे जातात याकडे पोलिसांनी लक्ष ठेवायला हवे, अशा मागण्याही सोमनाथ ओझर्डे यांनी केल्या. विकास गोगावले यांचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्यास सोमनाथ ओझर्डे यांनी यापूर्वी ५१ हजारांचे बक्षीस जाहिर केले होते, हे बक्षीस १ लाखांचे करित असल्याचेही सोमनाथ ओझर्ड यांनी या पत्रकार परिषदेत जाहीर करून मोठा गौप्यस्फोट केला आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही