परभणीला जाणाऱ्या एसटी बसला लागली अचानक आग
गंगाखेड : लातूर ते परभणी जाणारी बस परभणी राष्ट्रीय महामार्गावर दैठणा आणि गंगाखेड पोलिस स्टेशन हद्दीत बसच्या इंजिनला अचानक आग लागली. धूर निघताच चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच बस रस्त्याच्या बाजूला थांबवली. वाहक, चालकाने बसमधील 30 प्रवाशांना जलदगतीने बाहेर काढले. लागलेली आग माती व पाणी टकल्याने आग आटोक्यात आणली.
हेदेखील वाचा : Panchgani Crime: पाचगणीत बारबालांचा पुन्हा धिंगाणा; 20 जणांना बेड्या, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त
गंगाखेड आगाराची बस लातूर मुक्कामी होती. गुरूवारी सकाळी लातूरहुन पानगाव, रेणापूर, धर्मापुरी गंगाखेडमार्गे परभणीला जात होती. बसने (एम.एच २० बी.एल.२६९१) लातूर मार्गाने थांबा घेत गंगाखेड येथे आली. गंगाखेड बसस्थानकात थांबा घेऊन परभणीला निघाली. दरम्यान, गंगाखेड ते परभणी राष्ट्रीय महामार्गावर दैठणा हद्दीच्या सिमेवरील राष्ट्रीय महामार्गावर अचानक बसच्या इंजिनला आग लागली.
आठवड्यातील दुसरी घटना
बसच्या इंजिनला आग लागण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. तालुक्यातील धनगरमोहा येथे 5 जानेवारी रोजी बसच्या इंजिनला अचानक आग लागली होती. गंगाखेड आगरातील बसने पेट घेणे, स्टेअरिंग नादुरुस्त असने, चाके निखळून पडणे असे प्रकार घडत असल्याने खिळखिळ्या झालेल्या भंगार बस प्रवाशी वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याचे प्रवाशांनी बोलून दाखवले.
इंजिनने घेतला पेट..
बसला आग लागण्यापूर्वी धुराचा वास येताच चालक महादेव मुंढे याना आग लागण्याची शंका आली, त्यानी वेळीच प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. बस थांबताच बसच्या इंजिनने पेट घेण्यास प्रारंभ केला. यावेळी चालक महादेव मुंढे आणि वाहक चंद्रकांत नेमुलवार यानी बसमधील महिला, वृद्ध, लहान मुलांसह 30 प्रवाशांना त्वरित बाहेर काढले. त्यानंतर बसचालक आणि वाहक यानी आग लागलेल्या बस इंजिनवर शेत शिवारातून पाणी व माती टाकून लागलेली आग आटोक्यात आणली.
बसमधील 30 प्रवाशांचे वाचले प्राण
चालक महादेव मुंढे यानी दाखवलेल्या प्रसंगावधानाने बसमधील ३० प्रवाशांचे प्राण वाचले. दरम्यान, चालक महादेव मुंढे याच्या हाताला भाजल्याने ते किरकोळ जखमी झाले. त्यानंतर गंगाखेड आगाराची बस बोलावून प्रवाशांना परभणी बसस्थानकात सोडण्यात आले. आग लागलेली बस दुसऱ्या बसला टोचन लावून परभणी आगारात दुरुस्तीसाठी नेण्यात आली.
हेदेखील वाचा : CIDCO Lottery 2025: घर घेण्याचे स्वप्न होणार साकार, फक्त २५ लाखांत घर; कुठे मिळणार? जाणून घ्या सविस्तर