मेढा : सातारा जिल्हा परिषद (Satara Zilla Parishad) आणि जावली पंचायत समिती, तसेच मेढा नगरपंचायत निवडणूक ओबीसी आरक्षणासह होणार हे स्पष्ट झाल्याने जावलीकरांना व इच्छुक उमेदवारांना आता आरक्षण सोडतीचे वेध लागले आहेत.
जावली तालुक्यात जिल्हा परिषदेचे कुडाळ, कुसुंबी, म्हसवे हे तीन गट असून, खर्शी बारामुरे, म्हसवे, कुडाळ, सायगांव, आंबेघर तर्फ मेढा, कुसुंबी हे पंचायत समितीचे सहा गण आहेत. गटात व गणात आरक्षणाची लॉटरी कोणाला लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. पंचायत समितीबरोबरच मेढा नगरपंचायतीची मुदत संपल्याने सध्या तालुक्यात प्रशासकराज सुरू आहे.
ओबीसी आरक्षणाला विलंब लागत असल्याने निवडणूक लांबल्या होत्या. मात्र, गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २७ टक्के जागा आरक्षित करण्याचे आदेश दिल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीसह नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ओबीसीच्या इच्छुक उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्याचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहामध्ये करण्यात आले आहे.
मागील पंचवार्षिकला पंचायत समितीसाठी आंबेघर तर्फ मेढा, गणात ओबीसी महिला तर कुसुंबी गणात ओबीसी पुरुष आरक्षण पडले होते. त्यामुळे हे गण सोडून अन्य गणात ओबीसी आरक्षण जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली होती. आरक्षण सोडतेचा कार्यक्रम ही जाहीर झाला होता.