आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडून पाहणी
पुणे : राज्यामध्ये आषाढीवारीचा उत्साह आहे. आषाढी वारीला सुरुवात झाली असून आज आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. काल देहूनगरीमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा झाला. तुकाराम महाराजांची पालखी आज आकुर्डी येथे आहे. तसेच आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींची देखील पालखी आज निघणार आहे. संपूर्ण अलंकापुरीमध्ये वैष्णवांचा मेळा जमला आहे. सर्वत्र वारकरी असून हरि नामाचा गजर सुरु आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड परिसर अक्षरश: दुमदुमून गेला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील पालखी सोहळ्याची संपूर्ण तयारी केली असून याबाबत पिंपरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आढावा घेतला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे रवाना होणार आहे. मंदिर परिसराचा पोलीसांनी पाहणी केली आहे. पिंपरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मंदिर सुरक्षेचा आणि सोहळ्याचा आढावा घेतला. माउलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो भाविक आळंदीमध्ये दाखल झाले. मंदिर परिसरामध्ये व शहरामध्ये मोठी गर्दी झाली आहे. पालखी सोहळ्यासाठी पिंपरी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मंदिर परिसरामध्ये कड बंदोबस्त असून यंत्रणा सज्ज आहे. पोलीस सुरक्षा यंत्रणेमध्ये 6 डिसिपी,15 एसिपी, साडेचाशे अधिकारी, साडेतीन हजार पोलीस असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिराच्या ट्रस्ट बरोबर संपर्कात राहून चोख बंदोबस्त चालू आहेचर्चा झाली आहे. सोहळ्यामध्ये नियमित कार्यक्रम पार पडत असून त्याच पद्धतीने सर्व कार्यक्रम होतील, अशी माहिती पिंपरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिली आहे.
फोटो – नवराष्ट्र टीम
आळंदीमध्ये पालखी सोहळ्याचा उत्साह
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली आहे. शहरामध्ये सर्वत्र वारकऱ्यांच्या दिंड्या आल्या असून भाविक भक्तीभावाने दर्शन घेत आहेत. आळंदीमध्ये सर्व हरि नामाचा गजर होत असून संत ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष सुरु आहे. तसेच मंदिर परिसरामध्ये अभंग व कीतर्न सोहळा होत आहे. समाधी मंदिर परिसर विविध रंगी फुलांनी सजला आहे. समाधी मंदिरावर फुलांची सुरेख आरास करण्यात आली आहे. यामध्ये वैष्णवांचा महामेरु योगी ज्ञानेश्वर असा मजकूर लिहिण्यात आला आहे. फुलांनी लिहिलेल्या या ओळींनी शोभा वाढवली आहे. पालखी सोहळ्याच्या उत्साहाने अवघी अलंकापुरी दुमदुमली आहे.