Sury Ghar योजनेचा महाराष्ट्रात विक्रम! 9 लाखांहून अधिक घरांवर सोलर पॅनल, 8 लाख लाभार्थ्यांना लाभ

Sury Ghar Yojana: राज्यातील नऊ लाख नऊ हजार ११७ घरांच्या छतांवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून, त्यातून तीन हजार ४४५.३१ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता निर्माण झाली आहे.
Suryaghar Scheme In maharashtra
सूर्यघर योजनेत महाराष्ट्राची भरारी
Published on: 
Updated on: 
  • सूर्यघर योजनेत महाराष्ट्राची भरारी

  • नऊ लाखांहून अधिक घरांवर सौरऊर्जा

  • ६७ हजार घरांसह पुणे दुसऱ्या क्रमांकावर

किरण ढोणे / Sury Ghar Yojana: घरगुती वीजबिलाचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील नऊ लाख नऊ हजार ११७ घरांच्या छतांवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून, त्यातून तीन हजार ४४५.३१ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता निर्माण झाली आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत आठ लाख ११ हजारांहून अधिक (Pune) लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत सहा हजार ४१५.९० कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा करण्यात आले आहे.

नागपूर जिल्हा आघाडीवर; पुण्याची दुसरी कामगिरी

राज्यात सर्वाधिक घरांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात नागपूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. नागपूरमध्ये एक लाख २८ हजार १५७ घरांवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. पुणे जिल्ह्यात ६७ हजार ५९ घरांवर प्रकल्प सुरू असून, पुण्याने राज्यात दुसरे स्थान मिळवले आहे. जळगाव जिल्हा ६२ हजार ३८५ घरांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर (५८,८१०), नाशिक (५८,२४०), अमरावती (४९,९९१), कोल्हापूर (३९,९५५), अहिल्यानगर (३७,३१७), सोलापूर (३३,८९१) आणि बुलढाणा (२९,२३३) या जिल्ह्यांचाही पहिल्या दहा जिल्ह्यांत समावेश आहे.

Home Appliances: सौर ऊर्जेवर घरातील कोणती उपकरणे चालतात? दिवे, पंख्यांपासून AC पर्यंत सर्व उपकरणांची माहिती घ्या जाणून

तीन किलोवॅट प्रकल्पासाठी ७८ हजारांचे अनुदान

या योजनेतून घरगुती ग्राहकांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून क्षमतेनुसार अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये, तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पासाठी कमाल ७८ हजार रुपयांचे अनुदान मिळते. गृहनिर्माण संस्थांनाही लिफ्ट, पार्किंग आणि विद्युत वाहनांच्या चार्जिंगसारख्या सामायिक सुविधांसाठी प्रतिकिलोवॅट १८ हजार रुपये, कमाल ५०० किलोवॅट क्षमतेपर्यंत अनुदानाची तरतूद आहे.

अतिरिक्त वीज ग्रीडला पाठविण्याची सुविधा

घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारल्यानंतर दिवसा निर्माण होणारी वीज घरगुती वापरासाठी उपलब्ध होते. गरजेपेक्षा जास्त निर्माण झालेली वीज ग्रीडला पाठविण्याची सुविधाही ग्राहकांना मिळते. नेट मीटरिंगच्या माध्यमातून महिन्याभरातील वीजवापर आणि सौरऊर्जेतून निर्माण झालेल्या विजेचा हिशेब केला जातो. याशिवाय प्रकल्प उभारणीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्यातील अधिकाधिक घरगुती ग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. घराच्या छतावरील जागेचा वापर करून स्वतःची वीज निर्माण करण्यासोबतच वीजबिलात बचत आणि पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीला हातभार लावण्याची संधी या योजनेतून उपलब्ध झाली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरण आणि सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

सूर्यघर योजनेची राज्यातील आकडेवारी

एकूण सौरऊर्जाधारक घरे : ९,०९,११७

वीज निर्मिती क्षमता : ३,४४५.३१ मेगावॅट

अनुदान मिळालेले लाभार्थी : ८.११ लाखांहून अधिक

वितरित अनुदान : ६,४१५.९० कोटी रुपये

एक किलोवॅट प्रकल्पाचे अनुदान : ३० हजार रुपये

दोन किलोवॅट प्रकल्पाचे अनुदान : ६० हजार रुपये

तीन किलोवॅट किंवा अधिक प्रकल्पाचे अनुदान : ७८ हजार रुपये

योजनेचे उद्दिष्ट

दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज

India News : पर्यावरण रक्षणासह आर्थिक प्रगती शक्य; भारताने जगाला दिशा दाखविली, प्रिन्स विल्यम यांच्याकडून भारतीय उपक्रमांचे कौतुक

घरावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे फायदे

वीजबिलात बचत : घरगुती वीजखर्च कमी करण्यास मदत.

स्वतःची वीजनिर्मिती : छतावरील सौरऊर्जेतून दिवसा वीज उपलब्ध.

अतिरिक्त वीज : वापरापेक्षा जास्त वीज ग्रीडला पाठविण्याची सुविधा.

नेट मीटरिंग : निर्माण झालेली व वापरलेली वीज यांचा हिशेब.

अनुदान : केंद्र सरकारकडून ७८ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत.

कर्ज सुविधा : राष्ट्रीयीकृत बँकांकडून प्रकल्पासाठी कर्ज उपलब्ध.

पर्यावरणपूरक ऊर्जा : पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत.

Q

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा महाराष्ट्रातील किती घरांना लाभ झाला आहे?

A

महाराष्ट्रातील ९ लाख ९ हजार ११७ घरांच्या छतांवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून, या योजनेचा आतापर्यंत लाखो कुटुंबांना लाभ झाला आहे.

Q

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना किती अनुदान मिळाले आहे?

A

या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ८ लाख ११ हजारांहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत आतापर्यंत ६ हजार ४१५.९० कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा करण्यात आले आहे.

Suryaghar Scheme In maharashtra
India News : पर्यावरण रक्षणासह आर्थिक प्रगती शक्य; भारताने जगाला दिशा दाखविली, प्रिन्स विल्यम यांच्याकडून भारतीय उपक्रमांचे कौतुक