जिल्ह्याला चार दिवस 'येलो अलर्ट'
गडचिरोली : राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस होत आहे. तर काही भागांत पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहेत. उकाड्याने नागरिकांसह शेतकरी त्रस्त असताना हवामान विभागाने गुरुवारपासून (दि. 29) सलग चार दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे.
जुलै महिन्याच्या 20 तारखेपासून 20-25 दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे रोवणी केलेले धानपीक भूईसपाट झाले होते. तर पुरामुळे अनेकांच्या पिकांना मोठा फटका बसला होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. अधूनमधून पाऊस येत असल्याने वातावरणात थोडा गारवा होता.
निंदणीचे काम सकाळच्या पाळीत
मागील पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या कडक उन्हामुळे शेतीकामावर परिणाम झाला आहे. सध्या शेतात निंदणीचे काम सुरु असल्याने शेतकरी महिला मजुरांना सकाळ पाळीत काम करण्यास बांधावर नेत आहेत. दुपारनंतर प्रचंड उकाडा जाणवत असल्याने महिला मजुरांचे हाल होत आहेत.
विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
29 व 30 ऑगस्ट रोजी एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस तर 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर रोजी एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने त्यातच कडक ऊन पडत असल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे.
शेतजमिनीला पावसाअभावी पडल्या भेगा
त्यातच शेतजमिनीला पावसाअभावी भेगा पडल्या आहेत. तर नुकतेच रोवणी केलेले धानपीक कोमेजले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने 29 ऑगस्टपासून 1 सप्टेंबरपर्यंत पावसाचा येलो अलर्ट दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.