
Rain in Maharashtra
गोंदिया : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात काही ठिकाणी पाऊस होत आहे तर काही ठिकाणी अद्यापही प्रतिक्षाच आहे. असे असताना आता हवामान खात्याकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढचे तीन ते चार दिवस विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रातील मेघगर्जनेसह पाऊस पडतोय. मात्र, मान्सून पूर्णपणे राज्यात सर्वदूर दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभाग आणि कृषी विभागाचा सल्ला घेऊनच पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भ, मराठवाड्यामध्ये 24 जूननंतर पाऊस
दरम्यान, मान्सूनच्या प्रवासात 10 दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पाऊस पडत नाहीये. अशामध्ये कोकणामध्ये 21 जूननंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 24 जूननंतर चांगल्या पावसाचा अंदाज आहे.