BJP leader Parinay Phuke alleges that Prashant Koratkar is hiding in Congress leader's house
मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विरोधात अपशब्द वापरणारा प्रशांत कोरटकर गेल्या काही आठवड्यांपासून फरार आहे. धक्कादायक म्हणजे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर फरार झालेला प्रशांत कोरटकर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांची वेगवेगळी पथके त्याचा शोध घेत आहेत. पण अद्यापही त्याचा ठोस मागमूस लागलेला नाही. विशेष म्हणजे, न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन फेटाळला असून त्याला मुदतवाढ देण्यासही नकार दिला आहे.
अशातच प्रशांत कोरटकरला कोणतेही कायदेशीर संरक्षण नसतानाही पोलिसांना तो सापडत नसल्याने आता पोलिसांच्याही कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दुसरीकडे प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयात उद्या (23 मार्च) होणाऱ्या सुनावणीपूर्वीच तो देशाबाहेर गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रशांत कोरटकर कोलकातामार्गे दुबईला पळून गेला असून, पळून जाण्यासाठी नागपूर पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याला मदत केल्याचाही आरोप केला जात आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकर स्वतःच्या शिताफीने नाही, तर पोलिसांच्या आशीर्वादाने फरार झाला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर पोलिसांकडून कोणते स्पष्टीकरण दिले जाते आणि न्यायालय यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलीस दलातील दोन पथके नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत. त्यापैकी एक पथक काल चंद्रपूरमध्ये दाखल झाले. कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी तपास करून कोरटकरचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. एका माहितीनुसार, प्रशांत कोरटकर 19 मार्चपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये थांबला होता. मात्र,19 मार्चच्या रात्री त्याने हॉटेल सोडले आणि तिथून निघून गेला. पण नागपूरच्या दिशेने न जाता दुसरीकडेच कुठेतरी फरार अ अन्यत्र कुठेतरी पसार झाला. कोल्हापूर पोलिसांकडून हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याच्या हालचाली आणि त्याच्यासोबत कोण होते, याचा शोध घेतला जात आहे.
या शोधमोहीमेत कोल्हापूर पोलिसांना स्थानिक यंत्रणेकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. नागपूर आणि चंद्रपूरमधील काही घटक जाणूनबुजून अडथळे आणत आहेत का, याचाही तपास केला जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कुठून तरी कोरटकरला छुपी मदत मिळत आहे का? आणि याचाच फायदा घेत तो पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव आहे. न्यायालयीन सुनावणीच्या पार्श्वभूमीवर तो देशाबाहेर पळाला का? आणि त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? हे महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत. कोल्हापूर पोलिसांनी स्थानिक पातळीवर अधिक समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, मात्र प्रशांत कोरटकरचा मागमूस न लागल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा बनत चालला आहे.