शरद पवार पुण्यात येण्यापूर्वीच जयंत पाटील-अजित पवारांमध्ये भेट (Photo Credit- Social Media)
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार गट वेगळे झाले आहेत. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. पण, तत्पूर्वीच जयंत पाटील आणि अजित पवार या दोघामध्ये बंद केबिनमध्ये चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार हे व्हीएसआयच्या नियामक मंडळात आहेत. दरम्यान, राजकीय वर्तुळात एकीकडे जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे वसंतदादा साखर कारखान्याच्या बैठकीसाठी आले असताना जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये केबिनमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी अनेक नेतेमंडळी एकत्र येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली. 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ही चर्चा झाली असल्याची माहिती सध्या दिली जात आहे.
अनेक नेतेमंडळी राहणार उपस्थित
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी नियामक मंडळाची बैठक आहे आणि त्यासाठी शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत. हे सर्व नेते कमिटीमध्ये आहेत. या बैठकीसाठी आठ वाजण्याच्या सुमारास अजित पवार दाखल झाले. त्यांनी आधी सर्व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर त्यांना समजलं जयंत पाटील देखील आले आहेत. शरद पवार अजून पोहोचणार आहेत, अजित पवार यांनी ओएसडींना पाठवून जयंत पाटलांना बोलावून घेतलं, अशी माहिती आहे.
दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
सकाळी काही वेळात जयंत पाटील अजित पवारांच्या केबिनमध्ये आले. या केबिनमध्ये अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्याचबरोबर त्यांच्या पक्षांतराबाबत देखील चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. अशातच या भेटीमुळे आणि चर्चेमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.