'सोनाई'चे संचालक प्रवीण माने यांनी अपक्ष म्हणून दाखल केला उमेदवारी अर्ज; इंदापूरमध्ये येणार 'ट्विस्ट'
इंदापूर : ‘सकाळी माझे ग्रामदैवत वेबाबीरबुवाच्या चरणी नतमस्तक होऊन तेथील गुलाल पुडीत बांधून सभेला आलो आहे. त्या गुलालाची शपथ घेऊन सांगतो की, काहीही केले तरी मी उमेदवारी माघारी घेणार नाही. हाताने फक्त कपाळाला गुलाल लावतो. तो उधळण्यावर फक्त तुमचा अधिकार आहे’, अशा शब्दांत आपला इरादा स्पष्ट करत माजी जिल्हा परिषद सदस्य, सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांनी अपक्ष म्हणून इंदापूर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी प्रवीण माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदापूर शहरातून मोठी दुचाकी रॅली काढली. सर्व महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरगच्च गर्दीत सभा ही केली. सभेत बोलताना प्रवीण माने म्हणाले की, ‘१९९५ मध्ये इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्यानंतर तत्कालीन अपक्ष उमेदवार निवडून आला होता. तिरंगी लढत झाली तर अपक्ष उमेदवार निवडून येतो हा इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे. गेल्या 15 दिवसांत चित्र बदललेले आहे. आपल्याकडे नेते कमी असतील. मात्र, जनता आपल्या सोबत आहे’.
सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत. मी नव्हे तर आपण सर्व जण उमेदवार आहात. या भावनेतून ऐतिहासिक लढाईत सामील व्हा. आपल्या मेरीटवर, हात जोडून दहा मते मागू, पण कोणावर टीका करुन मिळणारी वीस मते आपल्याला नको. मी जर आमदार झालो तर संपूर्ण तालुका आमदार झाल्यासारखे वाटेल. आमचे नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्यावर आमची कायम श्रध्दा रहाणार आहे, असेही माने म्हणाले.
सोनाई उद्योग समुहाचे प्रमुख दशरथ माने म्हणाले की, निरपेक्ष भावनेने प्रवीण माने यांनी केलेली आजपर्यंतचे कार्य सर्वांसमोर आहे. निवडून आल्यानंतर ते शरद पवारांच्याच मांडीवर जावून बसणार आहेत. १९९५ ला हर्षवर्धन पाटील यांची बंडखोरी यशस्वी करण्याच्या पाठीमागे आपणच होतो. त्यावेळी राज्यात ४० हून अधिक अपक्ष निवडून आले होते. यंदा देखील प्रवीण माने यांना सोबत घेतल्याखेरीज सरकार स्थापनच होणार नाही, असा दावा त्यांनी केला.