कराड : नवनीत राणा (Navneet Rana) आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात नमूद केल्याप्रमाणे राजकीय आरक्षणातून अमरावतीमधून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेला आहात. कोणा एका पक्षाची दलाली करून मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये जाऊन हनुमान चालीसा वाचण्याऐवजी जर तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचन केलं असतं तर महाराष्ट्रच काय संपूर्ण देश तुमच्या पाठीमागे राहिला असता. परंतु, हिंदुत्वाची आणि जातीवादाची झालर तुम्ही परिधान केल्यामुळे तुम्हा उभयतांना हे शोभणारे नाही, असे पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी सांगितले.
हनुमान चालीसा वाचण्याच्या पाठीमागचा आपला उद्देश काय? हे तमाम महाराष्ट्राच्या समोर आपण जाहीरपणे सांगावे. अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषद अमरावतीमध्ये येऊन आपल्या निवासस्थानाच्या भोवती संविधान वाचन करून दाखवेल, असा इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्षनायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये दिला आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, खरोखरच तुम्ही जर मागासवर्गीय असाल तर तुम्ही दोघांनीही धम्मदीक्षा घ्यावी. हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन तुम्ही फिरत आहात हे चुकीचं आंबेडकरवादी जनता हे कदापी सहन करणार नाही. या देशात ज्या वेळी स्त्री गुलाम होती, त्यावेळी स्त्रीला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं आणि कायदे मंत्री असताना हिंदू कोड बिल स्त्रियांसाठी संसदेत मांडलं ते नाकारल्यानंतर कायदेमंत्रिपदाचा त्यांनी त्याग केला आणि त्याच संविधानाच्या आधारे आपण खासदार झालेला आहात तुमच्यावर संविधानाचे उपकार आहेत.
हनुमान चालीसाचे उपकार नाहीत आणि तुम्हाला दलित आदिवासी समूहाने प्रचंड मतांनी निवडून दिले आहे. घटनेचा आधार घेऊन शासकीय योजना त्यांच्या विकासासाठी राबवा हनुमान चालीसा वाचून निवडून दिलेल्या जनतेचा विकास होणार नाही. एकप्रकारे निवडून दिलेल्या जनतेशी आपण गद्दारी करत आहात. यापुढे हनुमान चालीसा हा हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मागासवर्गीयांचा अपमान कराल तर सर्व जनताही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असेही प्रा. सुभाष वायदंडे यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.