सौजन्य- सोशल मिडीया
जालना : वडीगोद्री येथील ओबीसी आरक्षणाचे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनस्थळी गोंधळ झाल्याची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ हाके यांच्या भेटीला गेल्यानंतर तिथे जमलेल्या कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यामुळे काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर गिरीश महाजन यांनी फोनवरून संपर्क साधत मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणली.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी जालना जिल्ह्याच्या वेशीवर लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकारचे शिष्टमंडळ आजही त्यांच्या भेटीसाठी तिथे गेले. पण अचानक तिथे जमलेल्या ओबीसी कार्यकर्त्यंनी घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट द्यावी आणि चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी याठिकाणी मंत्री गिरीश महाजन, गोपीचंद पडळकर, अतूल सावे उपस्थित होते.
याबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले, हा प्रश्न इथे बसून सुटणार नाही. त्यासाठी एक शिष्टमंडळ नेमण्यात येईल. ज्यांना हा विषय माहिती आहे असे अधिकारी आणि आपले शिष्टमंडळ यांना सोबत घेऊन यात गोपीचंद पडळकर, छगन भुजबळ यांच्यासह इतर लोकप्रतिनीधी असतील. अशी दहा-बारा जणांची टीम करू आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. चर्चेशिवाय मार्ग निघणार नाही. कायदेशीर बाजू समजून घ्याव्या लागतील. चर्चा करूनच यावर तोडगा निघेल, आम्हाला कोणावरही अन्याय करायचा नाही. यावर सकारात्मकच निर्णय होईल.
यानंतर ओबीसींचे शिष्टमंडळ आज सायंकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांची भेट घेतील असेही महाजन यांनी सांगितले.