
Pune municipal elections,
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर जिल्हा काँग्रेसने ब्लॉक निहाय बैठकांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, श्रीरंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली खडकवासला विधानसभा काँग्रेस पक्षाची पहिली आढावा बैठक पार पडली. पक्ष मजबूत करण्यासाठी प्रत्येक प्रभागात सशक्त नेटवर्क तयार करणे, स्थानिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे आणि जनसंपर्क वाढवणे यावर बैठकीत भर देण्यात आला. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणूक तयारीला गती देण्याचा संकल्प व्यक्त केला. पुढील काळात शिवाजीनगर ब्लॉक, हडपसर ब्लॉक, भवानी ब्लॉक, कोथरूड ब्लॉक, मार्केटयार्ड ब्लॉक, पर्वती ब्लॉक, पं. नेहरू स्टेडियम ब्लॉक, येरवडा ब्लॉक, वडगांवशेरी ब्लॉक, कसबा ब्लॉक, बोपोडी ब्लॉक व पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक यामध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
नगरपरीषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे दिसून आले. भाजपकडून घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकत्यांना प्रवेश दिला गेला. झालेल्या यापार्श्वभुमीवर निर्माण नाराजीमुळे असे प्रवेश न देण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे. यापार्श्वभुमीवर पुण्यात भाजपच्या ‘मिशन १२५’चे काय होणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच इतर पक्षातील कार्यकर्ते, माजीनगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याने मुळचे भाजपचे कार्यकर्ते नाराज होत आहेत. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते आम्ही ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांचा प्रचार करायचा का? असा प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकत्यांनी पक्षाने निर्धारित केलेला विहित नमुन्यातील उमेदवारी अर्ज मागविले आहेत. ८ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत अर्ज विक्री केली जाईल, याच मुदतीत अर्ज स्विकारले जाणार आहेत, अशी माहीती शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही इच्छुक उमेदवारांकडून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची माहीती गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केली गेली आहे. सर्वच पक्षांकडून इच्छुकांची माहीती अर्जाच्या माध्यमातून गोळा केली जाईल.