Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात पाणी संकट वाढणार; 'या' तारखेपासून १० टक्के पाणी कपात

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना, आता राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने १६ ऑक्टोबरपासून आणखी १० टक्के पाणीकपातीचा बडगा उगारला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पाणी संकट वाढणार; 'या' तारखेपासून १० टक्के पाणी कपात
सौजन्य - एआय
Published on: 
Updated on: 
  • पिंपरी-चिंचवड शहरात पाणी संकट वाढणार
  • १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणी कपात
  • पिंपरी-चिंचवडकरांच्या नशिबी पाण्याची वणवण

पिंपरी/विजया गिरमे :  पिंपरी- चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पवना आणि आंद्रा ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरलेली असतानाही पिंपरी-चिंचवडकरांच्या नशिबी असलेली पाण्याची वणवण संपलेली नाही. आधीच गेल्या सात वर्षांपासून (२५ नोव्हेंबर २०१९ पासून) शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना, आता राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने १६ ऑक्टोबरपासून आणखी १० टक्के पाणीकपातीचा बडगा उगारला आहे. परिणामी, ऐन सणासुदीच्या काळात शहरातील दैनंदिन पाण्याची तूट १०५ एमएलडीवरून थेट १७२ एमएलडीवर पोहोचणार असून, नागरिकांचे पाण्याचे हाल आणखी वाढणार आहेत.

'एल निनो'चा फटका आणि संभाव्य दुष्काळाचे सावट

राज्यातील विविध भागांमध्ये यंदा 'एल निनो'च्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यापासूनच वाढलेली उष्णता, भूगर्भातील विहिरी व कूपनलिकांची (बोअरवेल) खालावलेली पाणीपातळी आणि आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणी जपून वापरण्याचे आदेश दिले आहेत. पुढील वर्षभराचे नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागाने पालिकांना अनिवार्य १० टक्के पाणीकपातीचे निर्देश दिले असून, याचे काटेकोर पालन न झाल्यास आणि भविष्यात टंचाई निर्माण झाल्यास महापालिका प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशाराही दिला आहे.

सध्याची स्थिती आणि कपातीनंतरचे वास्तव (प्रतिदिन आकडेवारी)

पिंपरी-चिंचवड शहराची एकूण दैनंदिन मागणी: ७७० एमएलडी

सध्या होणारा प्रत्यक्ष पुरवठा: ६६५ एमएलडी

पवना धरण: ५४० एमएलडी

आंद्रा धरण: ९५ एमएलडी

एमआयडीसी: ३० एमएलडी

सध्याची दैनंदिन तूट: १०५ एमएलडी

१० टक्के कपातीनंतर मिळणारे पाणी: ५९८ एमएलडी

कपातीनंतर होणारी एकूण तूट: १७२ एमएलडी

वाकडमधील ३४ सोसायट्यांना केवळ ५० टक्के पुरवठा; टँकर लॉबी गब्बर

पाण्याच्या तुटवड्याचा सर्वात मोठा फटका नव्याने विकसित झालेल्या उपनगरांना बसत आहे. वाकड परिसरातील २०० ते ५०० सदनिका असलेल्या तब्बल ३४ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेकडून सध्या केवळ ५० टक्केच पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ऐन महागाईच्या काळात रहिवाशांना दररोज हजारो रुपये मोजून खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी शहरात प्रत्यक्ष येत नाही, तोपर्यंत या भागाला पूर्ण क्षमतेने पाणी देणे अशक्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

सात वर्षांपासून 'दिवसाआड'चा फेरा कायम

शहरातील वाढत्या लोकसंख्येला पुरेशा दाबाने व समन्यायी पद्धतीने पाणी मिळावे, या नावाखाली २५ नोव्हेंबर २०१९ रोजी महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय लागू केला होता. पुढील महिन्यात या तात्पुरत्या निर्णयाला तब्बल सात वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, सात वर्षांनंतरही वितरण व्यवस्था सुधारण्यात पालिकेला अपयश आले असून, अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाण्याच्या तक्रारी शहरात कायम आहेत. आता १० टक्के कपातीची भर पडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

"येत्या १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याबाबत राज्य सरकारचे स्पष्ट आदेश आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेला अधिकृत पत्र पाठवले जाईल."

— किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग. "शहरात मागणीच्या तुलनेत आधीच पाणी कमी मिळत आहे. १६ ऑक्टोबरपासून धरणातून जेवढा विसर्ग मिळेल, त्यानुसार शहरांतर्गत पाण्याचे पुनर्नियोजन केले जाईल." — अजय सूर्यवंशी, सह शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका